वर्धा जिल्ह्यातील सुरगावात वाळू माफियांच्या मनमर्जी कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 12:04 PM2021-02-03T12:04:12+5:302021-02-03T12:05:20+5:30
Wardha News वर्धा जिल्ह्यातील एकाही वाळूघाटाचा लिलाव अद्यापही झाला नसला तरी सेलू तालुक्यातील सुरगाव शिवारात सध्या वर्धा आणि सेलू तालुक्यातील माफियांना वाळूचा हांडा लागल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील एकाही वाळूघाटाचा लिलाव अद्यापही झाला नसला तरी सेलू तालुक्यातील सुरगाव शिवारात सध्या वर्धा आणि सेलू तालुक्यातील माफियांना वाळूचा हांडा लागल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. सूर नदीपात्रातून हे माफिया दररोज वाळूचा वारेमाप उपसा करीत असून, काही वाळू माफिया नदीकाठावरील शेतकऱ्यांना गप्प राहण्यासाठी पैशांचे आमिष देत असल्याची चर्चा परिसरात होत आहे. काही शेतकरी थेट लक्ष्मीदर्शनाचा योग साधत असल्याने वाळू माफियांचे चांगभलेच होत आहे.
सुरगाव शिवारात धांदे यांच्या शेताजवळ सूर, वाघाडी तसेच धाम नदीचा संगम आहे. याच भागात सध्या चांगल्या प्रतीची वाळू पावसाळ्याच्या दिवसांत वाहून आली आहे. तीनहून अधिक महिन्यांपासून सेलू तसेच वर्धा तालुक्यातील काही वाळू माफिया स्थानिक लोकप्रतिनिधीला हाताशी घेऊन वानखेडे तसेच धांदे यांच्या शेताशेजारी असलेल्या नदीपात्रातून मनमर्जी वाळूचा उपसा करून वर्धा शहरासह सेलू तालुक्यातील विविध भागांत पुरवठा करीत आहेत. गृहमंत्र्यांनी नुकताच वर्धा जिल्ह्याचा दौरा करून वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. परंतु, या सूचनांची या भागात कुठलीही अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र सध्या बघावयास मिळत आहे. पोलीस, महसूल तसेच उपप्रादेशिक परिवहन विभागाने संयुक्तपणे विशेष मोहीम हाती घेऊन वाळू माफियांच्या मनमर्जी कारभाराला ब्रेक लावण्याची गरज आहे.
पर्यावरणाचा होतोय ऱ्हास
वाळू माफियांकडून नदीपात्रात अवैध उत्खनन करून मनमर्जी वाळू उपसा केला जात आहे. यामुळे नदीचे पात्रच धोक्यात आले आहे. अवैध उत्खनन करताना वाळू माफियांकडून परिसरातील वृक्ष तोडली जात असल्याने पर्यावरणाचाही ऱ्हास होत आहे.
तस्करांचे केंद्र बनले दोन तालुक्यांची सीमा
ज्या भागात चांगल्या प्रतीची वाळू आहे आणि ज्या भागातून वारेमाप वाळूचा उपसा केला जात आहे, ते स्थळ वर्धा आणि सेलू तालुक्याच्या सीमेवर आहे. त्यामुळे याप्रकरणी पोलीस आणि महसूल विभागातील उपविभागीय अधिकाऱ्यांनीच लक्ष देत वेळीच धडक कारवाई करण्याची गरज आहे.