अलिखित संदर्भ साधनात पुरातत्त्वशास्त्राचे योगदान महत्त्वपूर्ण
By admin | Published: September 29, 2014 12:50 AM2014-09-29T00:50:06+5:302014-09-29T00:50:06+5:30
अलिखित संदर्भ साधनातील सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे पुरातत्त्वशास्त्र होय. जगातील अज्ञात इतिहास जगासमोर आणण्याचे महत्त्वाचे कार्य पुरातत्त्वशास्त्राच्या माध्यमातून होते.
वर्धा : अलिखित संदर्भ साधनातील सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे पुरातत्त्वशास्त्र होय. जगातील अज्ञात इतिहास जगासमोर आणण्याचे महत्त्वाचे कार्य पुरातत्त्वशास्त्राच्या माध्यमातून होते. यात उत्खननाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सिंधू संस्कृतीचे उदाहरण आहे. आधुनिक इतिहास जाणून घेण्याच्या जिज्ञासेतून पुरातत्त्वशास्त्र उदयास आले म्हणून इतिहास आणि पुरातत्त्वशास्त्र यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे, असे मत रा.तु.म. नागपूर विद्यापीठातील पुरातत्त्वशास्त्र विभागातील प्रा. डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे यांनी व्यक्त केले.
यशवंत महाविद्यालयात इतिहास विभागाद्वारे आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास देशमुख होते तर प्रमुख पाहूणे म्हणून प्रियदर्शिनी महिला महाविद्यालय, येथील इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रियराज महेशकर, प्रा. पुरुषोत्तम खोब्रागडे, प्रा. डॉ. विरेंद्र बैस, प्रा. नरेश कवाडे, प्रा. तेलंग, प्रा. प्रवीण भगत उपस्थित होते.
यानंतर बोलताना मार्गदर्शकांनी आधुनिक भारताच्या इतिहासात पुरातत्त्वशास्त्राने मोलाची भर टाकली आहे. यामुळेच इतिहास विषयाची व्याप्ती वाढली आहे. विभागप्रमुख प्रा. पुरुषोत्तम खोब्रागडे यांनी मानवी उत्क्रांतीचा अभ्यास पुरातत्त्वशास्त्रातून करण्यात येतो. सामान्याचे आयुष्य व मानवतेची कहानी हा इतिहासाचा आत्मा आहे. आजवरच्या वाटचालीस इतिहासच जबाबदार आहे. हे इतिहास विषयाचे महत्त्व आहे. आज अस्तित्वात असणाऱ्या शास्त्रामध्ये असे कोणतेच शास्त्र नाही की ज्याच्या मुळाशी इतिहास नाही. त्यामुळे इतिहासातील नोंदी आवश्यक असून त्या अचूक करण्यासाठी पुरातत्त्वशास्त्र उपयुक्त आहे, असे सांगितले.
याप्रसंगी आचार्य पदवी प्राप्त केल्याबद्दल प्रा. डॉ. महेशकर यांचा डॉ. विलास देशमुख यांच्या हस्ते सूतमाला देऊन सत्कार करण्यात आला. यासह उन्हाळी २०१४ एम.ए. इतिहास परीक्षेत ‘ओ’ ग्रेड प्राप्त करणाऱ्या आरती भिरखेडे, नाजुका तिमांडे, सचिन नगराळे, तुषार लांडे या विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते भेटवस्तू आणि संविधानाची उद्देश पत्रिका देऊन सन्मानित करण्यात आले.
यानंतर उदबोधन करताना डॉ. विलास देशमुख यांनी इतिहास संशोधकांनी ते शिल्प कोणाच्या काळात निर्माण झाले, ते कोणी निर्माण केले यापेक्षा त्या कलाकृतीच्या निर्मितीमागील भावना विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी असे आवाहन केले. यानंतर इतिहास मंडळ अध्यक्ष मोनाली भोयर यांनी वर्षभर झालेल्या कार्यक्रमाचे अहवालवाचन केले. कार्यक्रमाचे संचालन पुनम भोयर यांनी केले तर आभार प्रदर्शन भाग्यश्री हेटे हिने केले. कार्यक्रमाला प्रा. बेले, प्रा. नारायणे, प्रा. लोहकरे, प्रा. भालेकर आदींची उपस्थिती होती. आयोजनाला सुहास इंगळे, प्रतिक लोहकरे, सागर वानखेडे, रोहित गिरी, पल्लवी आडकिने, प्रांजली माटे, अनुश्री तडस, दीपाली वाघमारे, प्राजक्ता पाटील, पल्लवी शेंडे आदींनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)