आर्वीत साकारणार नाट्यगृह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 12:04 AM2018-10-26T00:04:58+5:302018-10-26T00:05:51+5:30
स्थानिक नगरपालिके अंतर्गत विविध विकास कामे झपाट्याने सुरू आहे. या विकास कामांच्या प्रगतीचा आलेख वाढत असताना त्यात आता पुन्हा नाट्यगृहाची भर पडली आहे. ४ कोटी रुपयातून येथे सुसज्ज नाट्यगृह साकारण्याचा मार्ग मोकळा झाला असून पालिकेकडे निधीही वळता करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : स्थानिक नगरपालिके अंतर्गत विविध विकास कामे झपाट्याने सुरू आहे. या विकास कामांच्या प्रगतीचा आलेख वाढत असताना त्यात आता पुन्हा नाट्यगृहाची भर पडली आहे. ४ कोटी रुपयातून येथे सुसज्ज नाट्यगृह साकारण्याचा मार्ग मोकळा झाला असून पालिकेकडे निधीही वळता करण्यात आला आहे.
शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता नगर पालिकेच्यावतीने शहरात विकास कामांचा सपाटा सुरु केला आहे. समाजातील प्रत्येक घटकांचा विकास व्हावा यासाठी भर दिली जात आहे. शहरात नेहमी विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांकरिता सुसज्ज असे नाट्यगृह असावे. जेणे करुन शहरासह तालुक्यातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळून त्यांच्या कला वृध्दींगत व्हाव्या. तसेच अनेकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना चालना मिळावी, याकरिता माजी आमदार दादाराव केचे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी नगर पालिकेचे नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, उपाध्यक्ष उषा सोनटक्के, गटनेता प्रशांत ठाकूर, सभापती व नगरसेवक यांची बैठक बोलावून नाट्यगृहाच्या निमिर्तीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना केल्या. नगर पालिका प्रशासनाने तात्काळ नाट्यगृहाच्या निर्मितीबाबतचा प्रस्ताव तयार करुन त्याबाबत पालिकेच्या सभागृहात मंजूरी घेण्यात आली. सभागृहाच्या मंजूरीनंतर तो प्रस्ताव माजी आमदार दादाराव केचे यांच्याकडे सोपविला.
माजी आमदार केचे यांनी हा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे सादर केला होता. त्यानंतर त्यांनी सतत त्याचा पाठपुराव केला. त्याचे फलीत म्हणून महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने राज्यातील नगर पालिकेंना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी देण्यात येणाऱ्या विशेष अनुदानातून आर्वी नगरपालिकेकरीता ४ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. हा निधी नगर पालिकेच्या खात्यात वळता करण्यात आल्याने आता लवकर या नाट्यगृहाच्या कामाला सुरुवात होणार आहे. आर्वीकरांसाठी हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माजी आमदार दादाराव केचे यांनी प्रत्यक्ष भेटून आभार मानले.
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या शहराच्या विकासाकरिता वेळोवेळी सहकार्य मिळत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विशेष कार्य अधिकारी सुमित वानखेडे यांचे नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे उपाध्यक्षा उषा सोनटक्के, गटनेते प्रशांत ठाकूर यांच्यासह पालिकेचे सभापती, नगरसेवक तसेच भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष विनय डोळे, भारतीय जनता युवा मोर्चाचे रामु राठी यांनी आर्वीकरांच्यावतीने आभार मानले. आता या नाट्यगृहाच्या निर्मितीकडे आर्वीकरांचे लक्ष लागले आहे.
आर्वीकरांनी मानले आभार
आर्वीत नाट्यगृहाच्या रूपाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासाची आणखी एक चाबी आर्वीकरांना सुपुर्द केली आहे. या शहराच्या नाट्यगृहाकरिता मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी तथा आर्वीचे पुत्र सुमित वानखेडे यांनी मोलाची मदत केल्याने त्यांचेही आभार मानले.