स्वातंत्र्यपूर्व काळातील वास्तू कालबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 12:04 AM2019-02-02T00:04:57+5:302019-02-02T00:05:34+5:30

देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी जिल्ह्याचा कारभार चालणाऱ्या इमारतीतूनच स्वातंत्र्यानंतरही आतापर्यंत कामकाज चालत होते. आज कालौघात जिल्हाधिकारी कार्यालयाची ऐतिहासिक वास्तू खिळखिळी झाल्याने तिच्यावर हातोडा चालविण्यात आला.

The architecture of the pre-independence era is out of date | स्वातंत्र्यपूर्व काळातील वास्तू कालबाह्य

स्वातंत्र्यपूर्व काळातील वास्तू कालबाह्य

googlenewsNext
ठळक मुद्देनियोजनभवन, जिल्हाधिकारी कार्यालयाचे नवनिर्माण : पर्यावरणपूरक इमारत ठरणार ‘युनिक’

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी जिल्ह्याचा कारभार चालणाऱ्या इमारतीतूनच स्वातंत्र्यानंतरही आतापर्यंत कामकाज चालत होते. आज कालौघात जिल्हाधिकारी कार्यालयाची ऐतिहासिक वास्तू खिळखिळी झाल्याने तिच्यावर हातोडा चालविण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील गतवैभवाची साक्ष देणारी वास्तू आता आठवडाभरात इतिहासजमा होणार आहे.
स्थानिक महात्मा गांधी पुतळ्याच्या बाजूला जिल्ह्याधिकारी कार्यालयाची ऐतिहासिक वास्तू आहे. ही इमारत १९०५ ते १० या कालखंडातील असल्याचे सांगितले जाते. याच इमारत परिसरात कालांतराने पोलीस अधीक्षक कार्यालय व इतर कार्यालयांची निर्मिती करण्यात आली. विशेषत: या परिसरातील रेकॉर्ड रुमची इमारत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीपूर्वीची असल्याचे सांगितले जाते. स्वातंत्र्यपूर्व काळातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीची मध्यंतरी १९२३ मध्ये दुरुस्ती करण्यात आली. पण, त्यानंतर मात्र ही इमारत खिळखिळी व्हायला लागली. जिल्ह्याचा कारभार चालणाºया इमारतीच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष केल्याने या इमारतीतील मनरेगा विभागात कार्यालयीन वेळेत स्लॅबचा काही भाग खाली कोसळला. त्यावेळी कार्यालयातील कर्मचारी ‘लंच टाईम‘ असल्याने चहा पिण्यासाठी बाहेर गेले असल्याने सुदैवाने दुर्घटना टळली. त्यानंतर या इमारतीच्या बांधकामाचा प्रस्ताव तयार करण्यात आला. या प्रस्तावाने चार ते पाच वर्षे मंत्रालयाच्या वाºया केल्यानंतर मागीलवर्षी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात नियोजनभवन व जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या बांधकामाला हिरवी झेंडी देण्यात आली.
त्यामुळे येथील सर्व कार्यालये इतरत्र हलवून इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आल्याने स्वातंत्र्यपूर्व काळातील ऐतिहासिक वास्तू पाडली जात आहे. इमारतीचे छत व इतर साहित्य काढले असून आता इमारतीवर गजराज चालविला जात आहे. त्यामुळे ऐतिहासिक वास्तू लवकरच नामशेष होणार आहे.
पंधरा महिन्यांत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य
जिल्हाधिकारी कार्यालय व नियोजन भवनाच्या इमारतीच्या बांधकामाचा श्रीगणेशा २ आॅक्टोबर, गांधी जयंतीदिनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला. तेव्हापासून १५ महिन्यांत ही इमारत पूर्ण करण्याचे निर्देशित केले आहे. त्यानुसार कंत्राटदाराने आपले काम सुरूही केले. सुरुवातीला जुन्या पोलीस अधीक्षक कार्यालयातील साहित्य काढून कार्यालय मोकळे करण्यात आले. परंतु, जिल्हाधिकारी कार्यालयातील साहित्य काढण्यातच वेळ गेला. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नोटीसही बजावण्यात आली होती. हे कार्यालय खाली करण्यासाठी तब्बल सहा महिन्यांचा कालावधी लागल्याने बांधकामही सहा महिन्यांपर्यंत खोळंबले होते. आता कामाने वेग घेतल्याचे दिसून येत आहे.
इमारतीसमोरील बगिचा देणार गांधी विचारांची साक्ष
जिल्हाधिकारी कार्यालय व नियोजनभवनाच्या निर्मितीकरिता शासनाकडून जवळपास ४० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या इमारतीच्या बांधकामाची निविदा २० कोटींमध्ये गेली असून कामालाही प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या संकल्पनेनुसार या इमारतीची डिझाईन तयार करण्यात आली आहे. ही इमारत पर्यावरणपूक असून १४८ बाय ३८ मीटर इतक्या आकारात साकार होणार आहे. सूर्यप्रकाश थेट या इमारतीत पडणार आहे. तसेच अधिकाºयांची दालने आणि इतर कार्यालयेही आगळी-वेगळीच राहणार असून येथे गांधींच्या विचारांची साक्ष देणारा बगिचाही साकारण्यात येणार आहे. त्यामुळे ही इमारत निश्चित युनिक ठरणार आहे.

Web Title: The architecture of the pre-independence era is out of date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.