वाळूमाफियांना उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचा आशीर्वाद?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 10:09 PM2019-05-25T22:09:15+5:302019-05-25T22:09:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : न्यायालयाच्या आदेशावरून वाळू उत्खननाला सध्या थांबा मिळाला आहे. परंतु, हिंगणघाट तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैधपणे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : न्यायालयाच्या आदेशावरून वाळू उत्खननाला सध्या थांबा मिळाला आहे. परंतु, हिंगणघाट तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैधपणे वाळूचा उपसा करून त्याची नियमबाह्य वाहतूक वाळूमाफियांकडून केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर वाळूमाफियांवर कारवाईच करू नका, असा लेखी आदेश उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्याची चर्चा सध्या पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये होत असल्याने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचा वाळूमाफियांना आर्शीवाद काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज आहे.
हिंगणघाट तालुक्यातून वर्धा, वणा, पोथरा व यशोदा नदी वाहते. याच नदींच्या विविध भागातील पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन करून वाळूची नियमबाह्य वाहतूक केली जात आहे. काही महिन्यांपूर्वी एका दबंग व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्तीचा मालकीचा वाळू भरलेले जड वाहन पोलिसांनी पकडले होते. त्यावेळी त्या दबंग व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्तीनेही आपला जोर लावून पोलिसांवर दबावतंत्राचा वापर केला. त्यानंतरच या बड्या पोलीस अधिकाऱ्याने एक लेखी आदेश काढून वाळूमाफियांविरुद्ध कुठलीही कारवाई करू नका, अशा सूचनाच दिल्याची खमंग चर्चा सध्या हिंगणघाट तालुक्यातील वडनेर, अल्लीपूर आणि हिंगणघाट या तीन पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांमध्ये होत आहे. याबाबत अधिकची माहिती जाणून घेतली असता आवक-जावक क्रमांक नमूद केलेले सदर लेखी पत्र सुमारे पाच महिन्यांपूर्वी हिंगणघाटच्या उपविभागीय पोलीस अधिकाºयांनी काढले होते. शिवाय, ते हिंगणघाट तालुक्यातीलच एका पोलीस ठाण्याला बजावल्याचेही सांगण्यात येते. महसूल व पोलीस विभागातील काही अधिकारी तसेच वाळूमाफिया यांच्यातील साटेलोट्यामुळेच सध्या अवैध उत्खननाचा व्यवसाय फोफावत असून या प्रकरणाची चौकशी करण्याची गरज आहे.
हिंगणघाटात २० च्या वर वाळूमाफिया
हिंगणघाट तालुक्यातून यशोदा, पोथरा, वर्धा आणि वणा नदी वाहते. याच नद्यांच्या बोरगाव, पारडी, चिचघाट, जुनोना, पोहणा आदी भागातील पात्रातून मनमर्जीने वाळूमाफियांकडून सध्या उत्खनन करून चढ्या दराने नागरिकांना वाळूची विक्री केली जात आहे. अवैधपणे उत्खनन करून तब्बल २० च्यावर वाळूमाफियांचा मनमर्जी कारभार सध्या सुरू असताना महसूल व पोलीस विभागातील अधिकारी कारवाई करण्याकडे दुर्लक्षच करीत असल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवर सुजाण नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे.
प्राथमिक चौकशीत उपविभागीय पोलीस अधिकाºयांनी वाळू माफियांवर कारवाई करू नका असा कुठलाही लेखी आदेश काढलेला नसल्याचे निदर्शनास येते. परंतु, असा काही प्रकार झाला काय याची शहानिशा केली जाईल. शिवाय दोषी आढळणाºयांवर कारवाई केली जाईल.
- निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा.