गावगुंडांची ‘भाईगिरी’ पोलिसांनी चांगलीच ठेचली; तीन दिवस पोलिस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 05:03 PM2023-06-28T17:03:35+5:302023-06-28T17:05:38+5:30
आरोपींकडून चाकू, तलवार रॉड या शस्त्रांसह कार जप्त
वर्धा : हॉटेलात दरोडा टाकून गल्ल्यातील ४ हजार रुपये हिसकावून ४० हजार रुपये खंडणी मागणाऱ्या तसेच पवनसूत पेट्राेलपंपावर तोडफोड करून पाच लाख रुपयांची खंडणी मागून १ हजार रुपये जबरीने हिसकावून नेणाऱ्या सहा आरोपींची ‘भाईगिरी’ रामनगर पोलिसांची चांगलीच ठेचली. आरोपींना २७ जून रोजी न्यायालयात नेले असता तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. पोलिसांनी आरोपींकडून एक कार, चाकू, तलवार, रॉड असा शस्त्रसाठाही जप्त केला. राजेंंद्रसिंग ऊर्फ गुड्डूसिंग लखनसिंग जुनी, रवींद्रसिंग ऊर्फ कालूसिंग जुनी, लीलाधर धर्मदेव कुमरे, अतुल अंकुश निमसडे, उज्ज्वला गणेश गवळी, आकाश किसन ढोक या सहा आरोपींना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर एकाचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
आरोपींनी तलवार, रॉड, चाकूचा धाक दाखवून शुभम मांडवगडे याच्या हॉटेलात धुमाकूळ घालून तुला हॉटेल चालवायचे असेल तर आम्हाला एक लाख रुपये दे व प्रत्येक महिन्याला ४० हजार रुपये महिन्याप्रमाणे खंडणी मागितली. तसेच १२०० रुपये हिसकावून तोडफोड केली होती. तसेच कारला चौकातील पवनसूत पेट्राेलपंपावर जात कार्यालयाची तोडफोड करून १ हजार रुपये जबरीने घेत पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच तोडफोड केल्याने पेट्राेलपंपाचे जवळपास ४ लाखांचे नुकसान झाले. पोलिसांनी अवघ्या काही तासांतच सहाही आरोपींना बेड्या ठोकून त्यांच्याकडील कार, शस्त्रे जप्त केली.
गावगुंडांचा सशस्त्र दरोडा, तोडफोड करून रोख हिसकावली
सर्व आरोपी सराईत गुन्हेगार
राजेंद्रसिंग ऊर्फ गुड्डुसिंग जुनी याला यापूर्वीदेखील जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. अटक केलेले सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध कलमांन्वये पोलिसात गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे आरोपींमध्ये एका तरुणीचादेखील समावेश आहे.
एमपीडीएअंतर्गत कारवाईची प्रक्रिया सुरू
पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी या घटनेची गंभीर दखल घेत आरोपींविरुद्ध कठोर कारवाई होण्यासाठी त्यांची कुंडली जमा करण्याच्या सूचना पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार येत्या काळात सराईत आरोपींवर एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.