भाजपच्या चारही मतदार संघातील दाव्यामुळे सेना अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 06:00 AM2019-09-06T06:00:00+5:302019-09-06T06:00:04+5:30
भाजपच्या वतीने नुकत्याच संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. ठाण्यावरून आमदार संजय केळकर निरीक्षक म्हणून आले होते. त्यांनी चारही विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. हिंगणघाटमध्ये विद्यमान आमदार समीर कुणावार यांच्याशिवाय भाजपातून कुणीही उमेदवारीसाठी दावेदारी केली नाही.
अभिनय खोपडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लोकसभा निवडणुकीच्या अभूतपूर्व यशानंतर आता विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. भाजपने जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यामुळे भाजप जिल्ह्यातील चारही मतदारसंघात निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे सेना-भाजपच्या युतीत सेनेच्या पदरात काय पडणार, हा प्रश्न अद्याप कायम आहे.
या प्रश्नाची सोडवणूक न झाल्याने सेनेच्या गोटातील शिवसैनिक अस्वस्थ आहेत. याचा थेट फटका निवडणुकीत भाजपला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. वर्धा जिल्ह्यात वर्धा, देवळी, हिंगणघाट, आर्वी हे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. देवळी व आर्वी या मतदारसंघात सध्या कॉँग्रेसचे आमदार आहेत. तर हिंगणघाट व वर्धा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. भाजपच्या वतीने नुकत्याच संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. ठाण्यावरून आमदार संजय केळकर निरीक्षक म्हणून आले होते. त्यांनी चारही विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. हिंगणघाटमध्ये विद्यमान आमदार समीर कुणावार यांच्याशिवाय भाजपातून कुणीही उमेदवारीसाठी दावेदारी केली नाही.
वर्धा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार डॉ. पंकज भोयर यांच्यासह दहा दावेदारांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. यात माजी खासदार सुरेश वाघमारे, वर्ध्याचे नगराध्यक्ष अतुल तराळे, वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे, सचिन अग्निहोत्री या प्रमुख दावेदारांचा समावेश आहे. मात्र, पंकज भोयर तिकीट आपल्यालाच मिळणार, यावर शंभर टक्के ठाम आहेत. पक्ष व मुख्यमंत्री आपल्या सोबत असल्याचा दावा ते करीत आहेत. भाजप-सेनेच्या गेल्या २५ वर्षांच्या युतीच्या काळात हिंगणघाट व वर्धा हे दोन मतदारसंघ शिवसेनेकरिता सोडले जात होते. त्यातील हिंगणघाट मतदारसंघात शिवसेनेने तीनवेळा भगवा फडकविला. शिवसैनिक हा मतदारसंघ आपल्याकरिता सोडला जाईल, या आशेवर आहेत. देवळी मतदारसंघ शिवसेनेला देण्याबाबत भाजपच्या गोटातून हालचाली सुरू आहेत. मात्र, याबाबत सेनेकडूनही फारसा प्रतिसाद नाही. आर्वी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी नुकतीच जाहीर सभा घेतली. मात्र, या मतदारसंघात भाजपकडे तीन प्रबळ दावेदार आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ सेनेला दिला जाण्याची शक्यता कमी आहे. राज्यस्तरावरून सेना-भाजप युतीबाबत स्पष्टता असली तरी वर्धा जिल्ह्यात शिवसेनेला कोणता मतदारसंघ सुटणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे सेनेचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. लोकसभा निवडणुकीत तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व शिवसेनेचे संपर्क प्रमुख माजी खासदार अनंत गुढे यांनी पुढाकार घेत दोन पक्षात मनोमिलन घडवून आणले होते. लोकसभा निवडणुकीनंतर सेना भाजपमध्ये पुन्हा असे सौख्याचे संबंध दिसत नाही. त्यामुळे दोघेही ‘एकला चलो रे’ च्या भूमिकेत आहेत. याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. देवळी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडल्या गेल्यास तेथे उमेदवार कोण? हा प्रश्न कायम राहणार आहे. भाजपकडेच उमेदवारी मागणारे काही नेते शिवबंधन हाताला बांधून पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. या मतदारसंघात चौथ्यांदा कॉँग्रेसकडून रणजित कांबळे मैदानात उतरणार आहेत. सेना-भाजपच्या वादात उमेदवार कोण राहतो, यावरच देवळी येथील समीकरण अवलंबून राहणार आहे. आर्वी विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेसकडे विद्यमान आमदार अमर काळे यांच्याशिवाय दुसरा चेहरा नाही. मात्र, त्यांच्यापुढे येथे यंदा तगडे आव्हान भाजपने निर्माण केले आहे. भाजप येथे कुणाला उमेदवारी देते, हेही अद्याप गुलदस्त्यात आहे.