वाघाचा बंदोबस्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 12:08 AM2019-10-12T00:08:47+5:302019-10-12T00:09:16+5:30
तालुक्यातील बांगडापूर, सिंदीविहीर, मरकसूर, अंभोरा, नांदोरा, रहाटी, उमरविहीरी, नागझरी, आजनडोह ही जंगलव्याप्त भागातील गावे असून येथे एक दिवसाआड वाघाचे दर्शन होत आहे. वाघाने येथील शेतशिवारात चांगलाच धुमाकूळ घातला असून महिन्याभरात २० च्यावर जनावरे फस्त केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : तालुक्यातील सावळी (खुर्द) व आगरगाव परिसरात वाघाने चांगलीच दहशत माजविली आहे. आतापर्यंत २० जनावरांसह एका गोपालकाच्या नरडीचा घोट घेतल्याने गावकरी आता आक्र मक झाले आहे. मृतकाच्या परिवाराला आर्थिक मदत देण्यासोबतच वन्यप्राण्यांचा तत्काळ बंदोबस्त करा, अशी मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. या निवेदनानंतर अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन करुन ग्रामस्थांना आश्वासन दिले.पण, आश्वासन नाही कृती करा या मागणीवर नागरिक ठाम आहेत.
सावळी (खुर्द) व आगरगाव ही दोन्ही गावे जंगलाला लागून असल्याने या परिसरात वन्यप्राण्यांसह वाघाचाही त्रास वाढला आहे. तालुक्यातील बांगडापूर, सिंदीविहीर, मरकसूर, अंभोरा, नांदोरा, रहाटी, उमरविहीरी, नागझरी, आजनडोह ही जंगलव्याप्त भागातील गावे असून येथे एक दिवसाआड वाघाचे दर्शन होत आहे. वाघाने येथील शेतशिवारात चांगलाच धुमाकूळ घातला असून महिन्याभरात २० च्यावर जनावरे फस्त केली आहे. त्यामुळे गोपालकांसह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली. पण, वनविभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने एका गोपालकालाही वाघाने ठार केले. त्यामुळे गावकºयांच्या संतापाचा भडका उडाला. वाघाच्या दहशतीत जगायचे कसे, शेतशिवारातील पिकांची राखन करायची कशी, असे अनेक प्रश्न निर्माण झाल्याने गावकरी एकवटले. त्यांनी प्रशासनाला निवेदन देत तत्काळ वाघाचा बंदोबस्त करण्यासोबतच मृताच्या परिवाराला आर्थिक मदत आणि घरातील एका व्यक्तीला नोकरी देण्याची मागणी रेटून धरली. त्यामुळे कारंजाचे तहसीलदार सचिन कुमावत, वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. बी. गायनेर, पोलीस उपनिरीक्षक मोहन धुळे यांच्यासह महावितरणच्या अधिकाºयांनी गावात जाऊन नागरिकांची बैठक घेतली. मृताच्या परिवाराला आर्थिक मदत आणि नोकरीसंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. तसेच वाघाचा बंदोबस्त लवकरच करण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. पण, नागरिकांनी आश्वासन नाही तर वाघाचा बंदोबस्त करा, असा आग्रह धरल्याने वाघाच्या बंदोबस्ताकरिता शोधमोहीम राबविली जात आहे. वाघाला शोधण्याकरिता आता वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत गावकरीही जगलात फिरत आहे. परंतु वाघाचा थांगपत्ता लागला नाही.