आमदार रणजीत कांबळेंना अटक करा, अन्यथा...; भाजपा खासदारांचा थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 03:32 PM2021-05-11T15:32:58+5:302021-05-11T15:33:57+5:30
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या काँग्रेसच्या आमदाराची ध्वनीफीत व्हॉयरल झाल्यानंतर सोमवारी सायंकाळी उशीरा वर्धा शहर पोलीस ठाण्यात आ. रणजित कांबळे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वर्धा : कोविड संकटात आरोग्य यंत्रणेचा कणा म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडणारे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांनी भ्रमणध्वनीवरून शिवीगाळ करून थेट पोलीस अधीक्षकांसमोरच मारण्याची धमकी दिली. हा प्रकार कोविड योद्धा म्हणून काम करणाऱ्यांचा अपमान असून तो निंदनिय आहे. या प्रकरणातील दोषी आ. रणजित कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करून तातडीने अटक करण्यात यावी. अन्यथा भारतीय जनता पार्टी तालुका अन् जिल्हास्तरावर रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करेल, अशा इशारा भाजपचे खा. रामदास तडस यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे.
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या काँग्रेसच्या आमदाराची ध्वनीफीत व्हॉयरल झाल्यानंतर सोमवारी सायंकाळी उशीरा वर्धा शहर पोलीस ठाण्यात आ. रणजित कांबळे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे असले तरी आ. कांबळे यांनी यार्वी अनेक अधिकाऱ्यांना दमदाटी करून शिवीगाळ केल्याची माहिती आहे. परंतु, एकाही अधिकाऱ्याने पोलिसात तक्रार न दिल्याने त्यांची हिम्मत वाढत गेली. आ. कांबळे यांच्या जाचाला कंटाळून अनेक चांगले अधिकारी वर्धा जिल्हा सोडून इतरत्र निघुन गेले ही वस्तुस्थिती आहे. डॉ. डवले यांच्यासोबत घडलेला प्रकार निंदनिय असून त्यांनी पोलिसात तक्रार दिल्याने त्यांची हिम्मत कौतुकास्पद आहे. डॉ. डवले यांच्या समर्थनार्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या संघटना एकवटल्या आहेत. शिवाय सध्या राज्यभरात त्याचे पडसातही उमटत आहेत. दोषी आमदार रणजित कांबळे यांना तातडीने अटक करण्यात यावी. शिवाय त्यांच्याविरुद्ध लावण्यात आलेल्या कलमांमध्ये वाढ करण्यात यावी. येत्या काही तासांत आ. कांबळे यांना अटक न केल्यास भारतीय जनता पार्टीच्यावतीने रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे यावेळी खा. रामदास तडस यांनी सांगितले. पत्रपरिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, जि.प. अध्यक्ष सरिता गाखरे, जि.प. उपाध्यक्ष वैशाली येरावार, जि.प. आरोग्य व शिक्षण सभापती मृणाल माटे आदींची उपस्थिती होती.