वर्ध्यात ३ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या महिला वनरक्षकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 11:19 AM2019-05-03T11:19:09+5:302019-05-03T11:20:52+5:30
तीन हजारांची लाच स्वीकारताना महिला वनरक्षक लता शंकर भोवते (३२) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : तीन हजारांची लाच स्वीकारताना महिला वनरक्षक लता शंकर भोवते (३२) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे. विना रोखठोक मुरुम भरलेली मालवाहू त्यांच्या कार्यक्षेत्रातून जाऊ देण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती.
मुरुम भरलेला मालवाहू वन विभागाच्या कार्यक्षेत्रातून विना रोखठोक जाऊ देण्यासाठी ५ हजारांची लाच वनरक्षक लता भोवते यांनी तक्रारकर्त्यांला मागितली होती. त्यानंतर तडजोडी अंती ३ हजार रुपये देण्याचे ठरले. असे असले तरी लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून लाचखोर लता भोवते यांना तीन हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई एसीबी नागपूर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक राजेश दुद्लवार, पोलीस उपअधीक्षक विजय माहुलकर, पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब गावडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुहास चौधरी, नापोशी रोशन निंबोळकर, अतुल वैद्य, प्रदीप कुचनकार, सागर भोसले, अपर्णा गिरीजापूरे, स्मीता भगत, पल्लवी बोबडे, राजू शाहू यांनी केली.