पळालेल्या आरोपीला २४ तासांत अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 12:38 AM2018-04-16T00:38:18+5:302018-04-16T00:38:18+5:30
दारूच्या गुन्ह्यातील आरोपी शुक्रवारी पोलिसांच्या हाताला झटका देत सिनेस्टाईल पसार झाला होता. त्याला समुद्रपूर पोलिसांनी २४ तासांत हैदराबाद येथून अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : दारूच्या गुन्ह्यातील आरोपी शुक्रवारी पोलिसांच्या हाताला झटका देत सिनेस्टाईल पसार झाला होता. त्याला समुद्रपूर पोलिसांनी २४ तासांत हैदराबाद येथून अटक केली. शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्याला १७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
नागपूर-चंद्रपूर मार्गे मध्यप्रदेश येथून दारूची वाहतूक करणाऱ्या अभिजीत मडकावार याला पोलिसांनी गुरूवारी अटक केली होती. त्याला प्रथम श्रेणी न्यायालयात हजर करीत तीन दिवस पोलीस कोठडी मिळविली; पण परत पोलीस ठाण्यात नेत असता न्यायालयाच्या वऱ्हांड्यात आरोपीने पोलिसांच्या हाताला झटका दिला. दरम्यान, न्यायालयासमोर रस्त्यावर आरोपीचा भाऊ लोकेश मडकावार हा चालू अवस्थेत कार क्र. एमएम ३४ एए ७९५७ घेऊन उभा होता. अभिजीतने सिनेस्टाईल गाडीत बसून पलायल केले. कोठडीत पोलीस मारतील, या भीतीने त्याने पळ काढला होता.
घटना घडताच पाच पथके आरोपीच्या शोधात वेगवेगळ्या दिशेने रवाना झाली होती. २४ तासांतच गुन्हे शाखेने आरोपीला अटक केली. यात आरोपी अभिजीत मडकावार व लोकेश मडकावार या दोघांनाही हैद्राबाद येथून ताब्यात घेत गुन्हे नोंदविले. सदर कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगोले, उदयसिंग बारवाल, परवेज खान व ठाणेदार प्रवीण मुंडे यांच्यासह पोलीस कर्मचाºयांनी केली.