दोन दिवसांत साडेपाच हजार क्विंटल धान्याची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 05:00 AM2020-04-04T05:00:00+5:302020-04-04T05:00:17+5:30
देशात कोरोणाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नागरिकांना घराबाहेर पडण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. सर्वत्र लॉकडाऊन असल्याने राज्य व जिल्ह्यात सीमाबंदी करण्यात आली आहे. अशा स्थितीत अन्नधान्याचा तुटवडा पडू नये. शेतकऱ्यांची आर्थिक परवड दूर व्हावी म्हणून सुरु झालेल्या नियोजनबद्ध धान्य विक्रीला शेतकरी व व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : सर्वत्र लॉकडाऊन असतानाही राज्यातील नामांकित हिंगणघाटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची आवक चांगलीच वाढली आहे. दोन दिवसात या बाजार समितीत १८० वाहनांच्या माध्यमातून तब्बल ५ हजार ७०० क्विंटल धान्याची आवक झाली आहे. शेतकऱ्यांच्या आरोग्याकरिता येथे निर्जंतुकीकरण व सोशल डिस्टन्सिगचेही काटेकोरपणे पालन केले जात आहे.
देशात कोरोणाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नागरिकांना घराबाहेर पडण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. सर्वत्र लॉकडाऊन असल्याने राज्य व जिल्ह्यात सीमाबंदी करण्यात आली आहे. अशा स्थितीत अन्नधान्याचा तुटवडा पडू नये. शेतकऱ्यांची आर्थिक परवड दूर व्हावी म्हणून सुरु झालेल्या नियोजनबद्ध धान्य विक्रीला शेतकरी व व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हिंगणघाट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्य बाजारात बुधवारी ८२ वाहनांमधून १ हजार ८७५ क्विंटल तर शुक्रवारी ९८ वाहनांमधून ३ हजार ९०० क्विंटल धान्याची आवक झाली. गुरुवारी रामजन्मोत्सवानिमित्त धान्य बाजार बंद होता. धान्य बाजारातील गर्दी टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळला जावा म्हणून शेतमालाची आवक मर्यादित करून दररोज १०० वाहनांना प्रवेश दिला जातो. शेतकऱ्यांना बाजार समितीत संपर्क साधून आपल्या शेतमालाची नोंदणी केल्यानंतर त्यांना मिळालेल्या तारखेवरच त्यांचा शेतमाल घेण्यात येत आहे.
त्यानुसार प्रवेशद्वारावरच मास्क लावलेल्या शेतकऱ्यांचे सॅनिटेशन करुनच आत प्रवेश दिला जातो. वजन काट्यावर हमाल, मापारी यांची संख्या तीन ठेवली आहे. गर्दी होऊ नये म्हणून सुरक्षा रक्षक व कर्मचारी ठिक ठिकाणी नियुक्त केले आहे. कॅन्टीनमधील जेवण व्यवस्था पॉकेट मधून केली जात आहे. तसेच ध्वनिक्षेपकावरून सूचना देत हात धुण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच रोज सायंकाळी मार्केट यार्डचे निर्जंतुकीकरण करण्याची काळजी बाजार समिती व्यवस्थापनाकडून घेतली जात आहे.
अद्याप २० टक्के कापूस शेतकऱ्यांकडेच असल्याचा अंदाज
कापसाच्या जिनिंग प्रेसिंग प्रकियेला शासनाने अद्याप परवानगी दिली नाही. त्यामुळे कापूस मार्केट बंद आहे. आतापर्यंत जवळपास ७ लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. कापूस खरेदी उशिरा सुरु झाल्याने शेतकऱ्यांकडे आताही जवळपास २० टक्के म्हणजे २ लाख क्विंटल कापूस शिल्लक आहे, असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. त्यामुळे शासनाने या कालावधीतच कापसाचीही खरेदी तत्काळ सुरु करावी, अशी मागणी शेतकरी बांधवांकडून केली जात आहे.
कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी शेतकऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे. धान्य बाजारात गर्दी मर्यादित करण्यासाठी गरजूंनी आपल्या मालाची नोंद समिती कार्यालयात करावी. त्यांनतर दिलेल्या तारखेवर शेतमाल विक्रीसाठी आणून शेतकऱ्यांनी आपल्या आरोग्य सुरक्षेची पुरेपुर काळजी घ्यावी.
अॅड. सुधीर कोठारी, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगणघाट