वर्धा नदी जलाशयावर होणार विदेशी पाहुण्यांचे आगमन
By Admin | Published: December 2, 2015 02:13 AM2015-12-02T02:13:32+5:302015-12-02T02:13:32+5:30
ऋतू बदलाचे संकेत मानवापेक्षाही पशुपक्ष्यांना आधी लागतात. बदलत्या वातावरणानुसार पक्षी स्थालांतर करतात.
काही पक्ष्यांनी जमविले बस्तान : पक्षी अभ्यासक व पर्यटकांना पर्वणी
प्रभाकर शहाकार पुलगाव
ऋतू बदलाचे संकेत मानवापेक्षाही पशुपक्ष्यांना आधी लागतात. बदलत्या वातावरणानुसार पक्षी स्थालांतर करतात. स्थलांतराच्या काळात गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी उष्ण कटीबंधाच्या देश-विदेशातील विविध प्रजातीच्या पक्ष्यांचे येथील वर्धा नदीच्या जलाशयावर आगमन होत असते. यंदाही विविध प्रजातीच्या पक्ष्यांची नोंद घेण्याची संधी पक्षी अभ्यासकांना मिळणार आहे.
पावसाच्या कमी प्रमाणामुळे यंदा नदीच्या जलाशयात पाणी नाही. यामुळे विदेशी पाहुण्यांचे आगमन लांबले असून डिसेंबरच्या मध्यात ही पाहुणेमंडळी येणार असल्याचे दिसते. चीन, जपान, मलेशिया, साऊथ कोरिया, नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश आदी देशातून स्थलांतर करून विदेशी पक्षी आॅक्टोबरच्या प्रारंभी येऊन मार्च अखेरपर्यंत नदीकाठावर वास्तव्य करतात. यांच्यापैकी लांब चोचीचा काळा करकोचा, पिनटेल डक, गळ्यावर लालपट्टा असणारा खंड्या, पांढरा शुभ्र बगळा, बदलक या पक्ष्यांनी नदीच्या डोहाच्या जलाशयाजवळ आपले बस्तान आॅक्टोबरमध्येच जमविले आहे.
विदेशातून वर्धा नदीच्या जलाशयावर वा डोहाच्या काठावर येणारे विविध प्रजातीचे पक्षी देश-विदेशातून हिवाळ्यातील गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी चिल्या-पिल्यासह येतात. त्यांचा ४-५ महिने मुक्काम असतो. हे विदेशातील पक्षी नदीकाठावर मिळेत त्या ठिकाणी घरटी उभारतात. दिवसभर ते आकाशात फिरत असले तरी रात्री घरट्यात जातात; पण पहाट प्रहारापासून सूर्योदयापर्यंत हे विदेशी पाहुणे डोहाच्या जलशयात विहार करताना दिसतात. पहाट प्रहरापासून सकाळपर्यंत समूहाने हे पक्षी जलाशयाच्या पाणवट्यावर गर्दी करतात. पहाटेची भटकंती करणाऱ्या मंडळींनी हे दृश्य अनकदा डोळ्यात साठविले आहे.
सध्या मोर, लांडोर, ससाणा, चायनिज डक, बगळा, करकोचा या पक्ष्यांचा दररोज सकाळी जलायशावर विहार आहे. त्यांनाही आपल्या विदेशी मित्रांच्या आगमनाची प्रतीक्षा लागली आहे. पक्षीमित्र, पर्यटकांसाठी या विदेशी पाहुण्यांचे आगमन म्हणजे गुलाबी थंडीची पर्वणीच ठरत असते.