बाप्पाचे पावसासह आगमन
By Admin | Published: September 18, 2015 01:50 AM2015-09-18T01:50:28+5:302015-09-18T01:50:28+5:30
बाप्पा.. सर्वांचे लाडके दैवत. बाप्पाच्या स्वागताकरिता अनेकजण आतूर झाले होते. अशात गुरुवारी बप्पाचे आगमन झाले. घरोघरी दहा दिवसांकरिता बाप्पाची स्थापना झाली.
अनेकांची तारांबळ : पावसामुळे ढोल-ताशांच्या आनंदावर विरजण
वर्धा : बाप्पा.. सर्वांचे लाडके दैवत. बाप्पाच्या स्वागताकरिता अनेकजण आतूर झाले होते. अशात गुरुवारी बप्पाचे आगमन झाले. घरोघरी दहा दिवसांकरिता बाप्पाची स्थापना झाली. उत्तम पावसाकरिता अनेकांचे असलेले साकडे पूर्ण करीत बाप्पाने मुसळधार पावसाला घेऊनच दमदार आगमन केल्याने शेतकऱ्यांसह नागरिक सुखावले.
गणेशाच्या स्वागताकरिता महिन्याभरापासून अनेकांकडून तयारी सुरू होती. आज ढोल-ताश्यांच्या निनादात बाप्पाची आपल्या घरी स्थापना करावी, अशी अनेकांची इच्छा होती. मात्र पावसाच्या हजेरीने त्यावर विरजण पडले. पहाटे ३ वाजतापासून पावसाने हजेरी लावल्याने बाप्पाला आपल्या घरी कसे न्यावे याची अनेकांना काळजी पडली होती. काहींनी छत्रीचा तर काहींनी प्लास्टिकच्या पन्नीचा आधार घेतला. सुरू असलेल्या पावसात सकाळी बाप्पाला घरी नेतांना अनेकांना चांगलीच कसरत करावी लागल्याचे चित्र दिवसभर बघायला मिळाले. दुपारी पावसाने थोडी उसंत घेतली होती. शेतकऱ्यांसह नागरिक या पावसाने सुखावले. मात्र बाप्पाच्या स्वागताकरिता आपण केलेली तयारी या पाण्यामुळे कुचकामी ठरली अशा प्रतिक्रीयाही बऱ्याच जणांनी दिल्या. वाहन मुषक असले तरी आज बाप्पा दुचाकी व कारमूधन प्रवास करताना दिसले. दिवसभरानंतर दुपारी पावसाने उसंत घेताच अनेकांनी घाई करीत जसे जमेल तसे बाप्पांना घरी आणून स्थापना करणे पसंत केले.पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे बाजारात गणेशमूर्ती विक्रीकरिता आलेल्या व्यवसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली असल्याचे चित्र बाजारात होते. यासोबतच सार्वजनिक मंडळांचीही चांगलीच अडचण झाली. काही गणेश मंडळांनी ‘वॉटरफ्रूट’ मंडप तयार न केल्यामुळे त्यांना लगबगीने ही सोय करावी लागली. मंडप डेकोरेशन व्यावसायिकांचे भावही वधारले होते. असे असले तरी बाप्पाचे पावसासह झालेले आगमन सुखावणारे ठरले.(प्रतिनिधी)
सावंगीत ११ फूट उंच शाडूच्या गणेश मूर्तीची स्थापना
सावंगी येथे राधिकाबाई मेघे स्मृती ट्रस्टद्वारे आयोजित गणेशोत्सवाला कुलपती दत्ता मेघे, शालिनी मेघे, आ. डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते श्रीगणेशाच्या स्थापनेने प्रारंभ झाला. या महोत्सवानिमित्त १२ दिवसांच्या काळात वैद्यकीय, दंत व आयुर्वेद रूग्णालयांद्वारे विशेष आरोग्य तपासणी शिबिरे व जनजागृतीपर उपक्रमही आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती कुलपती दत्ता मेघे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
अभिमत विद्यापीठाच्या परिसरात गरूडासनावर आरूढ ११ फूटांची शाडूची श्रीगणेशमूर्ती स्थापित करण्यात आली आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूने महाराष्ट्राचे कुलदैवत विठ्ठल रूक्मिणी, तुळजा भवानी, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा साकारण्यात आल्या आहे. रौप्य महोत्सवी वर्षाची पूर्तता करणाऱ्या दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेच्या सांस्कृतिक महोत्सवाचाही शुभारंभ यावेळी झाला. या संपूर्ण शैक्षणिक परिसरात नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली असून मनोवेधक सजावट, सप्तरंगी कारंजी, झगमगणारी भव्य प्रवेशद्वारे यांनी हा परिसर सजविण्यात आला आहे.