अन्न-पाण्याच्या शोधात फिरणाऱ्या पक्ष्यांसाठी कृत्रिम पाणवठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 10:51 PM2019-04-29T22:51:48+5:302019-04-29T22:52:06+5:30
कोल्हीच्या जंगलातील पाणवठे पूर्णपणे आटल्याने या पक्ष्यांचे प्रजनन धोक्यात आले आहे. जंगलात भ्रमंतीसाठी जात असलेल्या पक्षिमित्रांना या ठिकाणी पॅराडाईज व इतर पक्ष्यांचा अधिवास असल्याचे दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : कोल्हीच्या जंगलातील पाणवठे पूर्णपणे आटल्याने या पक्ष्यांचे प्रजनन धोक्यात आले आहे. जंगलात भ्रमंतीसाठी जात असलेल्या पक्षिमित्रांना या ठिकाणी पॅराडाईज व इतर पक्ष्यांचा अधिवास असल्याचे दिसून आले.
पक्षीमित्र प्रवीण कडू यांनी या जंगलात कृत्रिम पाणवठे तयार करण्याची संकल्पना मांडली. ही सूचना वनपरिक्षेत्राधिकारी बनसोड यांना केली तेव्हा तेही मदतीसाठी तयार झाले. प्रवीण कडू, आशिष भोयर, प्रदीप गिरडे आणि वनविभागाचे दोन कर्मचारी मिळून तीन ठिकाणी छोटे-छोटे पाणवठे तयार केले असून त्यात निरंतर पाणीही टाकले जात आहे.
उन्हाची तीव्रता झपाट्याने वाढत आहे. जेथे मनुष्याला झळा असह्य होतात, तेथे या चिमुकल्या जिवांची अवस्था किती बिकट असेल, हे वेगळं सांगायला नको. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक प्रजातीचे पक्षी उष्मतामानामुळे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडत आहे.
या तीव्र ऊन्हामुळे जंगलात पक्षांसाठी असलेले नैसर्गिक पाणवठेही पूर्णत: आटले आहेत. त्यातच पॅराडाईज फ्लाय कॅचर (स्वर्गीय नर्तक), इंडियन पिट्टा (नवरंग), पिकेल्स ब्ल्यू (टिकेलचा माशीमार), ओलिएन्टल व्हाईट आय तसेच रॉकेट टाईल ड्रॅन्गो या पक्षांचा अधिवास हिंगणघाट शहरालगतच्या कोल्हीच्या जंगलात अधिक आहे. समुद्र किरणाºयावरील मॅन्ग्रो फॉरेस्ट (खाजन वन) वरून उन्हाळी पाहुणे पक्षी म्हणून हे पक्षी आपल्या भागात येतात.
घरटी बनवत अंडे देऊन आपल्या पिलांना परत घेऊन जातात. या पाणवठ्यावर विविध प्रकारच्या माशा आणि इतर कीटक येतात. जे या पक्ष्यांचे खाद्य आहे. पाणवठे तयार करण्यात आल्यामुळे पक्ष्यांच्या तृष्णा-तृप्तीची सोय झाली आहे. पक्षिप्रेमी आणि वनविभागाच्या या उपक्रमाचे तालुक्यात कौतुक केले जात आहे.
पहिल्याच दिवशी मोराच्या कळपाने भागवली तहान
२८ एप्रिलला कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले. त्याच दिवशी दुपारी वनकर्मचारी या पाणवठ्यात पाणी टाकण्यासाठी जात असताना ६ मोरांचा कळप पाणी पित असताना आढळल्याचे वनविभागाच्या कर्मचाºयाने सांगितले. त्यामुळे अशा पाणवठ्याची अत्यंत गरज असल्याचे यावरून दिसून आले. आगामी काळात वनविभागाच्या सहकार्याने या कृत्रिम पाणवठ्यांमध्ये आणखी वाढ करण्याचे पर्यावरण प्रेमींनी ठरविले आहे.