वर्धा शहरावर कृत्रिम जलसंकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 05:00 AM2021-08-28T05:00:00+5:302021-08-28T05:00:02+5:30
वर्धा नगरपालिका प्रशासन येळाकेळी तसेच पवनार येथील धाम नदीच्या पात्रातून दररोज २७ द.ल.ली. पाण्याची उचल करते. उचल करण्यात आलेल्या पाण्यावर पवनार तसेच वर्धा शहरातील आयटीआय टेकडीवरील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केल्यावर त्या पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा वर्धा शहरातील १६ हजार कुटुंबांना करते. समृद्धी महामार्गाच्या कामादरम्यान येळाकेळी येथून पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येळाकेळी तसेच पवनार येथील धाम नदीच्या पात्रातून पाण्याची उचल करून वर्धा शहरातील १९ प्रभागातील नागरिकांना वर्धा नगरपालिका प्रशासन पाणी पुरवठा करते. परंतु, रस्त्याच्या कामादरम्यान येळाकेळी-वर्धा आणि पवनार-वर्धा या दोन्ही मुख्य जलवाहिनी फुटल्या. या दोन्ही जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी ४८ तासांचा कालावधी लागणार असून पुढील दोन दिवस वर्धेकरांना पाणी पुरवठा होणार नाही. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा नागरिकांनी काटकसरीनेच वापर करावा, असे आवाहन न.प.च्या पाणी पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
वर्धा नगरपालिका प्रशासन येळाकेळी तसेच पवनार येथील धाम नदीच्या पात्रातून दररोज २७ द.ल.ली. पाण्याची उचल करते. उचल करण्यात आलेल्या पाण्यावर पवनार तसेच वर्धा शहरातील आयटीआय टेकडीवरील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केल्यावर त्या पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा वर्धा शहरातील १६ हजार कुटुंबांना करते. समृद्धी महामार्गाच्या कामादरम्यान येळाकेळी येथून पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली. तर वर्धा-दत्तपूर या मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान पवनार येथून वर्धा शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली. यामुळे पुढील दोन दिवस वर्धा शहरातील नागरिकांना नळाद्वारे पाणी पुरवठा होणार नाही. या दोन्ही जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर केले जात असले तरी ते काम पूर्णत्त्वास जाण्यासाठी किमान ४८ तासांचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात आले.
या परिसरातील नळाला येणार नाही पाणी
- मुख्य जलवाहिनी फुटल्याने वर्धा शहरातील साने गुरुजीनगर, गांधीनगर, सुदामपुरी, यशवंत कॉलनी, खडसे कॉलनी, मानस मंदिर, केळकरवाडी, आर्वी नाका परिसर, गजानननगर, म्हाडा कॉलनी, शास्त्री चौक, गौरक्षण वार्ड, भामटीपुरा, विग्नहर्तानगर, रामनगर, हिंदनगर, गोटेवादी, बापाटवाडी, पोतदार बगीचा, जैन मंदिर, कृष्णनगर, गुजराती भवन परिसर, मालगुजारीपुरा, इंदिरा मार्केट, वंजारी चौक, धंतोली चौक, राधानगर, साबळे प्लॉट, बचलर रोड, गोंड प्लॉट, हनुमाननगर, शिवनगर, स्टेशन फैल, दयालनगर, मांगगारुडी मोहल्ला, तारफैल, झाकीर हुसैन कॉलनी, एम.जी. मोहल्ला, सिव्हील लाईन, मोहिनीनगर, शिवाजी चौक परिसर, ठाकरे मार्केट, गोलबाजार, कच्छी लाईन, मुख्य बाजार पेठ, महादेवपुरा, लक्ष्मीनगर, स्नेहलनगर, सेवाग्राम रोड, बेद ले-आऊट, हिमालाय विश्व वसाहत, नागपूर रोड, महिला आश्रम, फुलफैल, आनंदनगर, इतवारा, लहानुजीनगर या भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.