धानोली (मेघे) येथे कृत्रिम पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:21 AM2018-05-25T00:21:43+5:302018-05-25T00:21:43+5:30
धानोली (मेघे) येथे पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीला मुबलक पाणी असताना वॉर्ड क्र. ३ या गरीबांच्या वसाहतीत नळाला पाणीच येत नाही. यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या मुख्य पाईपलाईनचा लिकेज व्हॉल्व्ह गाठून महिलांना पाणी भरावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : धानोली (मेघे) येथे पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीला मुबलक पाणी असताना वॉर्ड क्र. ३ या गरीबांच्या वसाहतीत नळाला पाणीच येत नाही. यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या मुख्य पाईपलाईनचा लिकेज व्हॉल्व्ह गाठून महिलांना पाणी भरावे लागत आहे. तब्बल तीन महिन्यांपासून या नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत असल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. सरपंच व ग्रामसेवक यांचे मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
१५०० लोकवस्ती असलेल्या गावात एकूण तीन वार्ड आहेत. पाणी पुरवठ्याची मुबलक पाण्याची विहीर व जलकुंभ आहे. दोन वॉर्डात पाणीपुरवठा करताना भर उन्हाळ्यात सांडपाण्याच्या नाल्या धो-धो वाहत असून हजारो लिटर पाणी वाया जाते; पण वार्ड क्र. ३ या गरीबांच्या वस्तीत पाण्याच्या थेंबासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. ग्रा.पं. च्या दुर्लक्षामुळे या वॉर्डात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सरपंच व ग्रामसेवकांनी अनेक कामांत गैरप्रकार करून खोटी देयके लावून पैसे उचलले. ही बाब चौकशी अधिकाºयांच्या तपासणीत सिद्ध झाली आहे. ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीत सत्यता आढळल्याने सरपंच व ग्रामसेवकांवर कार्यवाहीची टांगती तलवार आहे. पोलिसांत गुन्हाही दाखल होणार आहे. यामुळे सरपंच व ग्रामसेवकाने गावाला वाऱ्यावर सोडल्याचे दिसून येत आहे. विहिरीवरून पाण्याच्या टाकीत गेलेल्या पाईपलाईनवरील एका लिकेज व्हॉल्व्हवर पायपीट करीत महिला व नागरिकांना पाणी आणावे लागते. याकडे वरिष्ठांनी लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी धानोलीच्या ग्रामस्थांनी केली आहे.
भ्रमणध्वनी स्वीच आॅफ
गावातील पाणीटंचाईबाबत ग्रामसेवक व सरपंच यांचे मत जाणून घेण्याकरिता संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी स्वीच आॅफ दाखवित होता.