शहरालगतच्या ११ गावांत कृत्रिम ‘पाणीबाणी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 11:26 PM2019-02-22T23:26:56+5:302019-02-22T23:27:25+5:30
शहरानजीकच्या ११ ग्रा.पं.तील सुमारे १६ हजार कुटुंबीयांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा करीत असून यंदाच्या वर्षी झालेल्या अल्प पावसामुळे उपलब्ध पाण्याचे सध्या योग्य नियोजन केले जात आहे. त्यातच पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेला महिन्याभऱ्याचा स्टॉक संपल्याने सध्या जीवन प्राधिकरणकडे कृत्रिम पाणीबाणी निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरानजीकच्या ११ ग्रा.पं.तील सुमारे १६ हजार कुटुंबीयांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा करीत असून यंदाच्या वर्षी झालेल्या अल्प पावसामुळे उपलब्ध पाण्याचे सध्या योग्य नियोजन केले जात आहे. त्यातच पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेला महिन्याभऱ्याचा स्टॉक संपल्याने सध्या जीवन प्राधिकरणकडे कृत्रिम पाणीबाणी निर्माण झाली आहे. यामुळे येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत पिपरी (मेघे)सह वर्धा शहरालगतच्या ११ गावांतील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येणार नसल्याचे जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्राप्त माहितीनुसार, पिपरी (मेघे), सिंदी (मेघे), सावंगी (मेघे), बोरगाव (मेघे), वायगाव (नि.), कारला, आलोडी, साटोडा, नालवाडी, म्हसाळा व वरूड या ११ गावांना जीवन प्राधिकरणच्यावतीने पाणीपुरवठा केल्या जातो. शहरानजीकच्या सावंगी (मेघे) येथे वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय तर वर्धा शहराच्या शेजारीच महात्मा गांधी आंतराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ आहे. त्यांनाही जीवन प्राधिकरणच पाणी पुरवठा करते. परंतु, गुरूवार २८ फेबु्रवारीपर्यंत पाणी पुरवठा केल्या जाणार नसल्याने याचा परिणाम सदर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि हिंदी विद्यापीठाच्या अडचणीत भर पडणार आहे. यंदाच्यावर्षी जिल्ह्यात कमी पाऊस पडल्याने भविष्यातील जलसंकट लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने उपलब्ध पाण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार वर्धा शहराशेजारच्या ११ ग्रा.पं.तील नागरिकांसाठी १३.०१ द.ल.घ.मी. पाणी सोडण्यात आले होते. ते फेब्रुवारी महिना लोटण्यापूर्वीच संपल्याने आणि पाटबंधारे विभाग आता मार्च महिन्यात जलाशयातील पाणी सोडणार असल्याने येत्या २८ फेबु्रवारीपर्यंत जीवन प्राधिकरणद्वारे ११ गावांमधील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येणार नाही. पाटबंधारे विभागाकडून जलाशयातील पाणी सोडल्यानंतर त्याची उचल करून त्याचा पुरवठा सदर ११ ग्रा.पं.तील सुमारे १६ हजार कुटुंबियांना करण्यात येणार आहे.
येळाकेळीच्या धामनदीपात्रातून होते पाण्याची उचल
जीवन प्राधिकरण विभाग येळाकेळी येथील धाम नदीपात्रातून पाण्याची उचल करून त्यावर प्रक्रिया करून शुद्ध पाण्याचा पुरवठा पिपरी (मेघे), सिंदी (मेघे), सावंगी (मेघे), बोरगाव (मेघे), वायगाव (नि.), कारला, आलोडी, साटोडा, नालवाडी, म्हसाळा व वरूड या गावांमधील नागरिकांना करते; पण सहा दिवस नळाला पाणी येणार नसल्याचे वास्तव आहे.
जिल्ह्यातील जलाशयांत २१.८७ टक्के जलसाठा
जीवन प्राधिकरणच्यावतीने सध्या दोन दिवसांआड वर्धा शहराच्या शेजारील ११ ग्रा.पं.तील रहिवाशांना पाणीपुरवठा केला जातो. असे असले तरी जिल्ह्यातील जलाशयांत सध्या केवळ २१.८७ टक्केच पाणी शिल्लक असून एप्रिल महिन्यात जलसंकट गडद होण्याची करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
भविष्यातील जलसंकट लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने दोन दिवसाआड नागरिकांना पाणी पुरवठा सध्या करण्यात येत आहे. फेबु्रवारी महिन्याचा स्टॉक संपल्याने आणि उपलब्ध पाणी पावसाळा सुरू होण्यापर्यंत पुरवायचे असल्याने वर्धा शहराशेजारच्या ११ गावांमधील नागरिकांना २८ फेब्रुवारीपर्यंत पाणी पुरवठा करण्यात येणार नसून जीवन प्राधिकरणकडून जलाशयातील पाणी सोडण्यात आल्यावर त्याची उचल करून नागरिकाना पाणीपुरवठा करण्यात येईल. नागरिकांनीही उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा.
- व्ही. पी. उमाळे, उपविभागीय अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वर्धा.