आर्वीत भाजप, आंजीमध्ये सत्ताधारी तर तळेगावात विरोधक विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 11:36 PM2018-02-28T23:36:52+5:302018-02-28T23:36:52+5:30
रिक्त पदांसाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. यात आर्वी तालुक्यात भाजपाने वर्चस्व कायम ठेवले तर तळेगावात विरोधकाने बाजी मारली.
ऑनलाईन लोकमत
वर्धा : रिक्त पदांसाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. यात आर्वी तालुक्यात भाजपाने वर्चस्व कायम ठेवले तर तळेगावात विरोधकाने बाजी मारली. आंजी (मोठी) येथे सत्ताधारी गटाच्या उमेदवारानेच विजय मिळविले. जिल्ह्यात अन्य ठिकाणीही भाजप व सत्ताधारी गटांनीच जागा जिंकल्या आहेत.
आर्वी : तालुक्यातील बोथली नटाळा व भादोड ग्रा.पं. पोट निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश मिळविले. नटाळा येथे सरपंच पदासाठी काँगे्रसच्या नेत्या तथा माजी जि.प. सभापती रजनी नानाजी देशमुख यांचा भाजप प्रणित उमेदवार शिला रामदास राऊत यांनी केवळ १६ मतांनी पराभव करीत इतिहास घडविला. या निकालामुळे तालुक्यात कमालीची चर्चा रंगली आहे.
तालुक्यातील नटाळा या ग्रा.पं. च्या निकालात भाजप प्रणित शिला राऊत सरपंच पदासाठी तर मिरा प्रमोद कंगाले या दोन वॉर्डातून विजयी झाल्या. सुभाष नारायण पडगीलवार निवडून आले आहेत. भादोड ग्रा.पं. निवडणुकीत खुशाल कवडू मसराम, लता गजानन माणिकपुरे, नितीन धनराज राऊत, इंदिरा ना. आत्राम, सुनीता भीमराव नेवारे हे निवडून आले आहेत.
निकाल जाहीर होताच भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. माजी आमदार दादाराव केचे यांच्या आर्वी विधानसभा क्षेत्रातील सर्वांगीण विकास कामांमुळे स्थानिकांनी भाजपप्रणित उमेदवारांना पसंती दिली, असे दिसते. निवडून आलेल्या उमेदवारांसाठी माजी आमदार दादाराव केचे यांच्यासह पं.स. सभापती शिला पवार, धर्मेंद्र राऊत, राजू पवार, सचिंद्र उर्फ राजू कदम, जयंत नेपटे, रोशन पवार आदींनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.