राज्यपालांना पदमुक्त करण्यासाठी आर्वीकर पाठविणार दररोज ६० पोस्टकार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2022 05:30 PM2022-11-29T17:30:46+5:302022-11-29T17:33:56+5:30
आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात नागरिकांत रोष
आर्वी (वर्धा) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्यांची राज्यपाल पदावरून हटविण्यात यावे, अशा आशयाचे पोस्टकार्ड दररोज आर्वीकरांकडून पाठविण्यात येणार आहे. हे अभिनव आंदोलन आर्वीकरांनी सुरू केले असून दररोज ६० पोस्टकार्ड पाठविले जाणार आहे.
आर्वी विधानसभा क्षेत्रातून १० हजार १०१ पोस्टकार्ड पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आर्वी शहरातून तीन दिवसांपूर्वीच त्याची सुरुवात अंगद कृष्णराव गिरधर आणि मित्रपरिवार यांनी केली आहे. आतापर्यंत ४५० पाेस्टकार्ड पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यपाल नेहमीच महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करतात. तसेच आमच्या जाणत्या राजाबद्दल चुकीचे विधान करून आमचे तसेच सर्व महाराष्ट्राचे मन कलुषित केले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यपालांना पदमुक्त करा, अशी मागणी पाठविलेल्या पत्रातून करण्यात येत आहे. यापूर्वी माजी आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध करून जोडे मारो आंदोलन केले होते. तसेच पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला होता, त्यानंतर माजी आमदार अमर काळे यांनी रक्ताने पत्र लिहून राष्ट्रपती यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी करण्याचे पत्रातून विनंती केली होती.
आता आर्वी विधानसभा क्षेत्रातून दहा हजार पत्र पाठविण्यात येत आहे. आर्वी शहरातून याची सुरुवात झाली आहे. युवक आणि शहरातील नागरिक दररोज पन्नास ते साठ पत्र लिहून राष्ट्रपतींना पाठवित आहे. जोपर्यंत राज्यपालांची हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत पोस्टकार्ड लिहून पाठविण्याचे अभिनव आंदोलन सातत्याने सुरू राहणार आहे.
- अंगद कृष्णराव गिरधर