तब्बल 29 वर्षांपासून फरार एसआरपीएफ जवानाची आर्वी पोलिसांकडून धरपकड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 05:00 AM2021-08-01T05:00:00+5:302021-08-01T05:00:17+5:30

त्याने ३ जून १९९२ मध्ये कॅम्प परिसरात स्वत:जवळ असलेल्या रायफलने काही राऊंड फायर करुन नागरिकांना जखमी केले होते.  ही घटना २९ वर्षांपूर्वी घडली होती. तेव्हापासून  सुभाष नाखले हा रायफल आणि काही राऊंडसह फरार होता. सुभाष मुळचा आर्वी तालुक्यातील धनोडी बहाद्दरपूर येथील रहिवासी असल्याने सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती आर्वी पोलिसांना दिली होती. तेव्हापासून आर्वी पोलीस सुभाष नाखलेच्या शोधात होते.

Arvi police arrest SRPF jawan who has been absconding for 29 years! | तब्बल 29 वर्षांपासून फरार एसआरपीएफ जवानाची आर्वी पोलिसांकडून धरपकड !

तब्बल 29 वर्षांपासून फरार एसआरपीएफ जवानाची आर्वी पोलिसांकडून धरपकड !

Next
ठळक मुद्देफायरिंग करून झाला होता रायफलसह पसार : धनोडी बहाद्दरपूर येथून घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : तब्बल २९ वर्षांपासून फरार असलेल्या  आरोपी जवानाला आर्वी पोलिसांनी मोठ्या शिताफीने धनोडी बहाद्दरपूर येथील त्याच्या निवासस्थानाहून ताब्यात घेतले. सध्या आरोपी जवान आर्वी पोलिसांच्या ताब्यात असून त्रिपुरा येथील कंचनपूर परिसरातील सीआरपीएफ कॅम्पच्या स्वाधीन करणार असल्याची माहिती आर्वीचे ठाणेदार संजय गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. सुभाष रामकृष्ण नाखले रा. धनोडी बहाद्दरपूर असे ताब्यात घेतलेल्या फरार जवानाचे नाव आहे.
सुभाष नाखले हा नॉर्थ त्रिपुरा जिल्ह्यातील कंचनपूर परिसरात असलेल्या आनंद बाजार येथील सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये जवान म्हणून कार्यरत होता. त्याने ३ जून १९९२ मध्ये कॅम्प परिसरात स्वत:जवळ असलेल्या रायफलने काही राऊंड फायर करुन नागरिकांना जखमी केले होते.  ही घटना २९ वर्षांपूर्वी घडली होती. तेव्हापासून  सुभाष नाखले हा रायफल आणि काही राऊंडसह फरार होता. सुभाष मुळचा आर्वी तालुक्यातील धनोडी बहाद्दरपूर येथील रहिवासी असल्याने सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती आर्वी पोलिसांना दिली होती. तेव्हापासून आर्वी पोलीस सुभाष नाखलेच्या शोधात होते.  दरम्यान सुभाष हा दोन दिवसांपासून धनोडी गावात फिरत असल्याची माहिती ठाणेदार गायकवाड यांना समजली. ठाणेदारांनी मोठ्या शिताफीने कर्मचाऱ्यांना सोबत घेत सापळा रचून फरार जवान सुभाष नाखले याला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. सोबत असलेली रायफल त्याने यापूर्वीच त्रिपुरा येथील एका व्यक्तीला दिली असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले असून याबाबत आरपीएफ कॅम्पला माहिती देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

२०१२ मध्ये घेतली होती त्याने वडिलांची भेट... 
१९९२ पासून फरार असलेला जवान सुभाष रामकृष्ण नाखले हा २०१२ मध्ये वडील रामकृष्ण यांची भेट घेण्यासाठी धनोडी गावात आला होता. केवळ दोन तास तो गावात राहिला होता. याची माहिती देखील आर्वी पोलिसांना मिळाली होती. तेव्हापासून आर्वी पोलिसांचे पथक आणि खबरे सुभाषच्या घरावर पाळत ठेवून होते. अखेर दोन दिवसांपूर्वी तो गावात आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सुभाषला ताब्यात घेतले. 

फरार काळात थाटला दुसरा संसार...
सुभाष नाखले याने फरार काळात पहिल्या पत्नीशी घटस्फोट न घेता दुसरा संसार थाटला. त्याला दुसऱ्या पत्नीपासून सहा मुली आणि दोन मुलं अशी अपत्ये असून ते सोबत राहत होते. मात्र, ही गोष्ट त्याच्या पहिल्या पत्नीला माहिती नव्हती. पतीशी पटत नसल्याने पहिली पत्नी त्याच्यापासून विभक्त राहत होती. पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी सध्या तामिळनाडू येथील एसआरपीएफ मध्ये कार्यरत असल्याची ही माहिती पोलिसांनी दिली.

अशी झाली कारवाई...
- आर्वी पोलीस ठाण्याचे ठाणेदार संजय गायकवाड यांनी आरोपी जवानाच्या शोधात विविध शोधार्थ लावली होती. सुभाष नाखले हा दोन दिवसांपासून धनोडी गावात आला असल्याचे समजताच ठाणेदारांनी पोलीस कर्मचारी संजय गोटफोडे याला त्याचा मागावर ठेवले. ताे कुठे जातो, घराबाहेर केव्हा निघतो याची माहिती जाणून घेतली. 

- त्यानंतर ठाणेदार संजय गायकवाड, अतुल गोडफोटे, प्रभाकर वाडवे, रंजीत जाधव, सतीश नंदागवळी, अनिल वैद्य, अतुल भोयर यांनी सापळा रचून फरार असलेला सीआरपीएफ जवान सुभाष नाखले याला ताब्यात घेतले. 

नाव बदलवून राहिला विविध राज्यात...
सुभाष नाखले याने सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये फायरिंग करुन सोबत रायफल घेऊन फरार झाला होता. २९ वर्ष तो स्वत:चे नाव बदलवून विविध जिल्ह्यांसह राज्यात राहिला.  सुभाष नाखले याने  अशाेक तुकाराम मोरे या नावाने गुजरात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये राहिला. इतकेच नव्हे तर मुंबई, भिवंडी, जळगाव, नाशिक जिल्ह्यात ही तो नाव बदलवून वास्तव्य करीत होता अशी माहिती ठाणेदार संजय गायकवाड यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

 

Web Title: Arvi police arrest SRPF jawan who has been absconding for 29 years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.