आर्वी-तळेगाव महामार्गाचा विक्रम; चार वर्षानंतरही मार्ग पूर्ण होईना!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 03:15 PM2023-04-17T15:15:02+5:302023-04-17T15:16:43+5:30
बारा किलोमीटरचे खस्ताहाल : गिनिज बुकामध्ये नोंद करा, प्रवाशांकडून होतेय मागणी
आर्वी (वर्धा) : येथील आर्वी-तळेगाव मार्ग म्हटला की अनेकांच्या अंगावर काटे उभे राहतात. या मार्गावरील खडतर प्रवासामुळे हा मार्ग आता जिल्ह्यातच नाही तर विदर्भात प्रसिद्ध झाला आहे. आर्वी ते तळेगाव हा केवळ १२ किलोमीटरच्या मार्गाचे गेल्या ४ वर्षांपासून काम सुरू असून, अद्यापही हा मार्ग पूर्णत्वास गेला नसल्याने नवा विक्रम नोंदविला आहे. त्यामुळे या मार्गाची ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड’ मध्ये नोंद करावी, अशी मागणी या मार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्यांनी केली आहे.
आर्वी-तळेगाव या मार्गावर अमरावती, नागपूरवरून, मोर्शी, वरुड आदीसह मध्य प्रदेशकडे जाणारा मार्ग आहे. तसेच तळेगाव, आर्वी, पुलगाव मार्गे आंध्र प्रदेशकडे जाता येते. त्यामुळे हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असून याची अवस्था फारच बिकट झाली आहे. आर्वीकरांना नागपूरला जायचे असेल तर खरांगणा मार्गे जावे लागते. या खडतर मार्गाने गेल्या चार वर्षात अनेकांना विविध आजारांचा उपहार दिला आहे. आर्वी ते तळेगाव मार्गाचे काम तातडीने पूर्णत्वास जावे, याकरिता सत्ताधारी व विरोधकांनीही आंदोलने केली. परंतु चार वर्षात हा प्रश्न मार्गी लागला नाही. केंद्रात आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार असतानाही या मार्गाचा प्रश्न कुणीच का सोडवू शकले नाही? असा प्रश्न प्रवाशांकडून विचारल्या जात आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याची दखल घेतल्यानंतर नवीन कंत्राटदाराला काम देण्यात आले. ऑगस्ट २०२२ पर्यंत ६० टक्के काम पूर्ण करून देण्याची लेखी हमीही देण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला होतो. मात्र, पावसाळा सुरू झाला आणि कंत्राटही रद्द झाल्याने काम ठप्प पडले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जानेवारी महिन्यात पुन्हा नवीन कंत्राटाची निविदा काढली. आधीच्या कंत्राटदाराकडे सर्वच साहित्य व यंत्रणा असतानाही काम बंद का करण्यात आले, हे कळलं नाही? नव्या कंत्राटदाराला एका वर्षात काम पूर्ण करून द्यायचे असल्याने आता कधी पूर्ण होणार? आणखी हे काम किती वर्षे चालणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
निविदेमध्ये १२ किमीच्या कामाकरिता ३३ कोटींची वाढ
चार वर्षांपासून सुरू असलेल्या या महामार्गाच्या कामाकरिता आतापर्यंत चार कंत्राटदार बदलण्यात आले आहे. आता पुन्हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने १३ जानेवारीला ९९.५४ कोटींची निविदा काढली आहे. चार वर्षांपूर्वी या महामार्गाचे काम सुरू झाले तेव्हा या कामाची अंदाजित किंमत ६६.८८ कोटी होती. चार वर्षात आधीच्या कंत्राटदारांनी बरेच काम पूर्णत्वास नेले असतानाही आता ही निविदा ९९.५४ कोटींची कशी काढली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पूर्वीच्या कंत्राटदाराने सहा किलोमीटर सिमेंट रस्त्याचे काम एका बाजुने पूर्ण केले आहे. वर्धामनेरी येथील मोठ्या पुलाचे काम तसेच लहान-मोठ्या पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. तरीही नवीन निविदेमध्ये ३३ कोटींची वाढ कशी झाली? हा संशोधनाचा विषय ठरत आहे.
चार वर्ष होऊनही आर्वी-तळेगाव या मार्गाचे बारा किलोमीटर काम पूर्ण झाले नाही, ही शोकांतिका आहे. आतापर्यंत चार कंत्राटदार बदलण्यात आले. मात्र, नेमकी अडचण काय हेच समजत नाही. आता नवीन कंत्राटदार काम केव्हा सुरू करणार, हे सांगता येणार नाही. या रस्त्याच्या विक्रमी कार्याची नोंद गिनिज बुकमध्ये व्हायला पाहिजे असे वाटते.
- डॉ. श्याम भुतडा, सामाजिक कार्यकर्ते, आर्वी
आर्वी ते तळेगाव या मार्गाचे चार वर्षांपासून काम अपूर्ण आहे. नेहमी या मार्गाने जाणे-येणे करावे लागते. वाहने तर खिळखिळी झालीच पण शरीराचे सर्व अवयवही या मार्गाने प्रवास करताना ढिले झाले आहे. या मार्गाची नोंद गिनिज वर्ल्ड बुकमध्ये होणे अत्यावश्यक आहे.
- प्रा. नितीन माथनकर,नियमित प्रवासी