आर्वी, तळेगावात पांढऱ्या सोन्याला मिळतो विक्रमी भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2022 05:00 AM2022-01-07T05:00:00+5:302022-01-07T05:00:40+5:30
कापसाच्या उत्पन्नात सुद्धा काही प्रमाणात कमी आल्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांना कमी कापसाचे पीक झाले असल्याने सुद्धा कापसाची आवक कमी होत असल्याचे शेतकरी सांगतात. आर्वीच्या कृषी उत्पन्न बाजार पेठेत कोणत्याही शेतकऱ्यांनी आपला कापूस विकण्याकरिता आणल्यानंतर त्या शेतकऱ्यांना कापसाच्या अन्य बाजारपेठेच्या तुलनेत तोलाई व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा कापूस विकण्याकरिता खर्च लागत नसल्याने सुद्धा आर्वीच्या कापूस मार्केट बाबत शेतकरी समाधान व्यक्त करत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डवर कापसाला दहा हजार ७० रुपये प्रतिक्विंटल भाव, कापसाचा नगदी चुकारा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डवर आणण्यास सुरुवात केली आहे. आर्वी तालुक्यात यावर्षी कापसाचा पेरा कमी प्रमाणात असल्याने मार्केट यार्डावर कापसाची आवक कमी प्रमाणात दिसत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
या वर्षी कापसाच्या उत्पन्नात सुद्धा काही प्रमाणात कमी आल्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांना कमी कापसाचे पीक झाले असल्याने सुद्धा कापसाची आवक कमी होत असल्याचे शेतकरी सांगतात. आर्वीच्या कृषी उत्पन्न बाजार पेठेत कोणत्याही शेतकऱ्यांनी आपला कापूस विकण्याकरिता आणल्यानंतर त्या शेतकऱ्यांना कापसाच्या अन्य बाजारपेठेच्या तुलनेत तोलाई व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा कापूस विकण्याकरिता खर्च लागत नसल्याने सुद्धा आर्वीच्या कापूस मार्केट बाबत शेतकरी समाधान व्यक्त करत आहे. आर्वी उपविभागात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या तशी कमीच आहे. मात्र आर्वी बाजारपेठ इंग्रजकालीन कापूस बाजारपेठ म्हणून प्रसिध्द आहे.
आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटमधील येत असलेल्या कापसाचे दिवसेंदिवस भाव वाढत आहे. कापसाला १० हजार ७० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाल्याने येणाऱ्या दिवसात कापसाची आवक नक्की वाढेल आतापर्यंत ७३ हजार तीनशे वीस क्विंटल कापूस खरेदी करण्यात आलेला आहे.
- विनोद कोटेवार,
सचिव बाजार समिती, आर्वी
सध्या तळेगाव येथील जिनिंगमध्ये दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकऱ्यांच्या कापसाला १० हजार रुपये भाव मिळत आहे. सध्या मिळत असलेल्या भावामुळे मी खूप समाधानी आहे. अशाप्रकारे शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळाल्यास शेतीत केलेला खर्च वसूल होऊन नक्कीच शेती व्यवसाय फायद्याचा ठरु शकतो. त्यामुळे आम्हाला भविष्यात कर्जबाजारी व्हावे लागणार नाही हे मात्र खरे..!
- वैभव हरिभाऊ गेडाम
शेतकरी, धाडी, ता. आष्टी.
एम. आर. जिनिंग, प्रेसिंग फॅक्टरीमध्ये दि. ३ व ४ जानेवारीला १० हजार रुपये दराने जवळपास सहाशे क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. याकरिता शेतकऱ्यांना पाच अंकी आकड्यात कापसाचा भाव मिळत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.
- गिरीष राठी,कापूस व्यापारी,
तळेगाव (शा. पं.)
पहिल्यांदाच कापसाला १० हजाराचा भाव
- तळेगाव (शा. पं.) : आष्टी तालुक्यातील तळेगाव येथील एम. आर. जिनिंगमध्ये इतिहासात पहिल्यांदाच ३ व ४ जानेवारीला शेतकऱ्यांना १० हजार रुपये क्विंटल भाव मिळाल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. तळेगाव येथे जिनिंगमध्ये उच्च प्रतिच्या कापसाला सर्वाधिक भाव मिळत आहे. यावर्षी अतिपावसाने व बोंड अळीच्या पादुर्भावाने कापसाच्या उत्पन्नात मोठी घसरण झाली आहे. त्यासोबत संपूर्ण राज्यासह देशामध्ये कापूस उत्पादन असलेल्या ठिकाणी कापसाचे उत्पन्न घटले आहे. त्यामुळे यंदा इतिहासात पहिल्यांदाच कापसाला विक्रमी भाव मिळत असल्याचे दिसून येत आहे. तळेगावात खासगी जिनिंगमध्ये नववर्षानंतर शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल १० हजार रुपयांचा भाव मिळत आहे.