आर्वीत जलदिनी पाण्यासाठी आंदोलन
By admin | Published: March 23, 2017 12:42 AM2017-03-23T00:42:32+5:302017-03-23T00:42:32+5:30
भुयारी गटाराचे काम करताना जेसीबीमुळे पाणी पुरवठ्याची पाईपलाईन फुटली. परिणामी, पाणी पुरवठा बंद झाला.
युवा स्वाभिमानचा दोन तास पालिकेत ठिय्या
आर्वी : भुयारी गटाराचे काम करताना जेसीबीमुळे पाणी पुरवठ्याची पाईपलाईन फुटली. परिणामी, पाणी पुरवठा बंद झाला. याविरूद्ध युवा स्वाभिमान व विठ्ठल वॉर्डातील नागरिकांनी सदर काम बंद पाडत मोर्चा काढला. पालिकेत दोन तास ठिय्या दिल्यानंतर झालेल्या चर्चेवरून आंदोलन मागे घेतले; पण पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला.
विठ्ठल वॉर्ड येथे भुयारी गटार योजनेचे काम सुरू होते. यात जेसीबीने खोदकाम करीत असताना पाणी पुरवठ्याची पाईपलाईन अनेक ठिकाणी पुुटली. नागरिकांनी विरोध केला असता दुरूस्तीचे काम आमचे नसून जीवन प्राधिकरणचे आहे, असे सांगितले. यावरून युवा स्वाभिमानचे दिलीप पोटफोडे, प्रमिला हत्तीमारे, शुभांगी कलोडे व नागरिकांनी कनिष्ठ अभियंता साकेत राऊत यांना बोलविले. त्यांनी तात्पुरते काम होऊ द्या, नंतर पाहू, असे उत्तर दिले. यावर पिण्याच्या पाण्याची समस्या पूर्णत: मार्गी लागत नाही, तोपर्यंत काम होऊ देणार नाही, अशी भूमिका युवा स्वाभिमान व नागरिकांनी घेतली. शिवाय मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधत काम थांबविले. यानंतर मोर्चा काढत युवा स्वाभिमानचे पदाधिकारी व नागरिक पालिकेवर धडकले. पाणी पुरवठ्याचा प्रश्न निकाली निघेपर्यंत कोणतेही काम होणार नाही, अशी भूमिका घेतली. शिवाय भूयारी गटारचे काम झाल्यास पाईपलाईन खाली दबेल. नळ जोडणी घेणाऱ्या नागरिकांना ड्रेनेज फोडावे लागेल. जोडणी असलेल्यांचा पाईप फुटला तर नेमका लिकेज कुठे आहे, हे कळणार नाही. जागोजागी ड्रेनेज फोडावी लागेल. नियोजनशून्य कामांमुळे पुन्हा तोडफोड करावी लागणार असल्याने खर्च व्यर्थ ठरेल. उन्हाळ्याची सुरूवात झाली असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागेल, या बाबी नगर परिषदेच्या लक्षात आणून दिल्या.