आर्वीत कडकडीत बंद
By admin | Published: June 8, 2017 02:22 AM2017-06-08T02:22:51+5:302017-06-08T02:22:51+5:30
कर्जमुक्ती, ५० टक्के नफ्यासह हमीभावासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाची धार सातव्या दिवशीही कायम होती.
शेतकरी संपाचा सातवा दिवस : दूध, भाजी फेकून शासनाचा निषेध
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कर्जमुक्ती, ५० टक्के नफ्यासह हमीभावासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाची धार सातव्या दिवशीही कायम होती. बुधवारी आर्वी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. इंझाळा, विरूळ (आ.), धनोडी (ब.) व पिंपळखूटा येथे शिवसेना, शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी रस्तारोको केला. वर्धेत प्रहार तर सेलू येथे शिवसेनेने भाजप सरकारचा निषेध नोंदविला.
शेतकरी आंदोलनाला बुधवारी प्रहार सोशल फोरमने बळ दिले. आर्वी बंदच्या आवाहनाला व्यापारी संघटना, भाजीपाला मार्केट संघटना, भीम टायगर सेना, शेर-ए-हिंद व वकील संघटनेने पाठिंबा दिला. यामुळे बंद १०० टक्के यशस्वी झाला. शेतकऱ्यांनी भाजीपाला शिवाजी चौकात रस्त्यावर फेकून शासनाचा निषेध नोंदविला. सकाळपासून व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती. शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या त्वरित मंजूर न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. आंदोलनात प्रशांत क्षीरसागर, अंकुश गोटफोडे, प्रशांत रामटेके, प्रणय गोहाड, विक्रम भगत, फारूक, गुड्डू पठाण, शेख कलीम, संजय कुरील, सवाई, दंभारे, कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.
इंझाळा येथील चौरस्त्यावर बुधवारी सकाळी ९ वाजता इंझाळा, तळणी, विजयगोपाल, हिरापूर, शेंद्री, दहेगाव (धांदे) व परिसरातील शेतकऱ्यांनी भाजप सकारचा निषेध केला. शासनाविरूद्ध घोषणाबाजी करीत रस्तारोको आंदोलन केले. आंदोलन शांततेत पार पडले. याप्रसंगी सर्व शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करून सातबारा कोरा करावा, शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्या या मागण्यांकरिता भाजीपाला फेकत दूध रस्त्यावर ओतले. एक तास ठिय्या व रस्तारोको आंदोलन केले. आंदोलक शेतकऱ्यांना पुलगावचे ठाणेदार मुरलीधर बुराडे व कर्मचाऱ्यांनी स्थानबद्ध करीत सुटका केली.
विरूळ येथे शेतकरी संघटना व प्रहार शेतकरी संघटनेद्वारे सकाळी ७ वाजात पुलगाव-आर्वी मार्गावर रस्तारोको आंदोलन करण्यात आले. प्रहारच्या महिला आघाडी प्रमुख अरुणा राजेश सावरकर, आर्वी तालुका संघटक विनोद इंगोले, प्रफुल अतवाने, घनश्याम क्षीरसागर, श्रवण गांढुळे, कुऱ्हेकर, टाले, सौदागर तर शेतकरी संघटनेचे राज्य सचिव सतीश दानी, जि.प. सदस्य ज्योती निकम, माजी जि.प. सदस्य गजानन निकम, गवारले, मानकर, माजरखेडे, कुंभारे, देशमुख, राजू यांच्यासह २०० च्या वर शेतकरी सहभागी होते. पोलिसांनी आंदोलकांना अटक करून पुलगाव पोलीस ठाण्यात स्थानबद्ध केले. त्यांची जामिणावर सुटका करण्यात आली.
पिंपळखुटा येथे बोथली, गुमगाव, तरोडा, किन्हाळा, चांदणी, दानापूर तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत रस्तारोको आंदोलन केले. यात वाहने अडविण्यात आली. रस्त्यावर दूध फेकून राज्यातील शेतकऱ्यांच्या संपाला प्रतीसाद देत भाजप सरकार विरोधात संताप व्यक्त करण्यात आला. सकाळी ६ वाजता सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येत शांततेत मोर्चा काढला. तब्बल एक तास रस्तारोको आंदोलन केल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदविण्यात आला.
प्रहारच्यावतीने बुधवारी बजाज चौक ते शिवाजी चौक दरम्यान दुचाकी रॅली काढून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्याचा मनसूबा पोलिसांनी हाणून पाडला. यामुळे शिवाजी चौकात निदर्शने करीत निषेध नोंदविला. यानंतर आ.डॉ. पंकज भोयर यांच्या घराकडे मोर्चा वळला. दरम्यान, वर्धा-आर्वी मार्गावर सरस्वती विद्या मंदिरजवळ आंदोलकांनी रस्त्यावर भाजीपाला फेकून नारेबाजी केली. आ.डॉ. भोयर नागपूर येथे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आल्याने निवेदन देता आले नाही. आंदोलनात निवृत्ती खडसे, स्रेहल खोडे, सतीश देवतळे, विनोद फुलकर, अखिल देशमुख, प्रशील धांदे, राजू लढी, प्रशांत घोडखांदे, अमित भित्रे, मयूर ढाले यांच्यासह प्रहारचे कार्यकर्ते व शेतकरी सहभागी होते.
सेलू येथील विकास चौकात तालुका शिवसेनेद्वारे रस्त्यावर कांदा टाकून भाजप शासनाच्या शेतकी विरोधी धोरणाचा निषेध नोंदविण्यात आला. याप्रसंगी शासनाच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली. आंदोलनात शिवसेनेचे तालुका प्रमुख रवींद चव्हाण, संघटक सुनील पारसे, जिल्हा उपप्रमुख किशोर बोकडे, अमर गुंदी, मंगेश करनाके, महादेव नेहारे, अजय पोहाणे, सुनील तिमांडे, धीरज दुर्गे, संजय देशमुख, अमित गोमासे, भोला वरटकर, आदी सह शिवसैनिक उपस्थित होते.