आर्वीत अतिक्रमण धारकांवर बडगा

By admin | Published: May 30, 2015 12:14 AM2015-05-30T00:14:30+5:302015-05-30T00:14:30+5:30

गत काही महिन्यांपासून प्रलंबित असणारे व वाहतुकीच्या मुख्य मार्गात अडथळा ठरणारे आर्वीतील रहदारीच्या व वर्दळीच्या ठिकाणी असणारे अतिक्रमण काढण्याची मोहीम पालिकेच्यावतीने हाती घेण्यात आली.

Arvite encroachment holders | आर्वीत अतिक्रमण धारकांवर बडगा

आर्वीत अतिक्रमण धारकांवर बडगा

Next

सिव्हील लाईन परिसरात मोहीम : नगरपरिषदेने घेतला विशेष ठराव
आर्वी : गत काही महिन्यांपासून प्रलंबित असणारे व वाहतुकीच्या मुख्य मार्गात अडथळा ठरणारे आर्वीतील रहदारीच्या व वर्दळीच्या ठिकाणी असणारे अतिक्रमण काढण्याची मोहीम पालिकेच्यावतीने हाती घेण्यात आली. याची कल्पना अतिक्रमण केलेल्या छोट्या दुकानदारांना देण्यात ुआल्याने त्यांनी शुक्रवारी आपले अतिक्रमण असलेले दुकान काढून घेतले. आर्वीतील विविध रस्त्यावर सकाळपासून हेच चित्र दिसत होते.
पालिकेच्यावतीने दुपारी १२ वाजतापासून न्यायालयासमोरील अतिक्रमण पोलीस संरक्षणात काढण्यात आले. दुपारनंतर सुभाष मार्केट परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले. ही अतिक्रमण मोहीम शनिवारी (दि. ३०) बंद करण्यात येणार आहे.
शनिवारी नेहरू मार्केट परिसर, बांगडी मार्केट, तहसील कार्यालय, शिवाजी ते गांधी चौक आदी भागातील अतिक्रमण काढण्यात येणार आहे. हे अतिक्रमण हटविण्यासाठी अतिक्रमणधारकांना तीन दिवसांची मुदत देण्यात आली होती. कारवाई करताना पालिकेचे नगर अभियंता सुधीर फरसोले, कनिष्ठ अभियंता संकेत राऊत, करअधीक्षक दिलीप खंडेलवाल, अभियंता सुरेंद्र लांगाणी, मुख्य लिपिक प्रकाश जायघरे, आरोग्य निरीक्षक सुरेंद्र मानकर, संजय अंगोरे, पंड्या व इतर कर्मचारी सहभागी होते. या मोहिमेसाठी पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक दीपेश म्हात्रे व दहा पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा होता. यानंतर पुढे अतिक्रमण होऊ नये, यासाठी महिन्यातून एकदा वाढलेल्या अतिक्रमणाचा आढावा घेत त्यावर पाठपुरावा करून पालिका सभागृहासमोर ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी टाकरखेडे यांनी दिली.
स्थानिक न. प. च्या जागेवर व इतर शासकीय जागेवर अतिक्रमण केले होते. ते हटविण्याबाबतची सूचना लघुव्यवसायिकांना देण्यात आली होती. त्यानुसार आर्वीतील सिव्हील परिसरातील अतिक्रमण धारकांना अतिक्रमण स्वत: हटविण्यासाठी दुपारपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्या सूचनेनुसार आज सकाळपासून या भागातील लघु व्यावसायिकांनी जि.प. कन्या शाळा परिसर, गांधी विद्यालय शाळा, वनपरिक्षेत्र कार्यालयासमोरील दुकाने, शिवाजी चौक, देऊरवाडा मार्ग, तहसील कार्यालयासमोरील फुटपाथवरची दुकाने, गांधी चौक, नेहरू मार्केट, इंदिरा चौक परिसर, पद्मावती चौक, शिवाजी शाळा परिसर उपजिल्हा रुग्णालय परिसर, गांधी चौक आदी परिसरातील अतिक्रमणधारक दुकानदारांनी आज सकाळपासून आपले अतिक्रमणात हटविण्यासाठी धावपळ सुरू केली.
शिवाजी चौकात सर्वाधिक पानटपऱ्या असून तो अमरावती मार्ग आहे. हा वळण मार्ग शिवाजी चौकातून जात असल्याने या परिसरात वाहतुकीची कोंडी होते. गर्दीतून वाहन काढणे जिकरीचे झाल्याने येथील अतिक्रमण काढण्यात येत आहे.(तालुका प्रतिनिधी)

अतिक्रमण काढण्याकरिता नागरिकांना पालिकेने दिला होला कालावधी
आर्वीत इंदिरा चौक, नेहरू मार्केट, बसस्थानक परिसर, शिवाजी चौक, देऊरवाडा मार्ग, पद्मावती चौक, शिवाजी चौक ते गांधी चौक व पोलीस ठाणे परिसर आदी भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढल्याने पालिकेसाठी डोकेदुखी ठरली आहे. चार वर्षांपूर्वी आर्वीत नवनियुक्त आलेले उपविभागीय अधिकारी व सध्याचे पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी आर्वीत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली होती; परंतु त्यानंतर परत अतिक्रमण जैसे थेच झाल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. याही अतिक्रमणामध्ये त्याचीच पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी पालिका प्रशासनाने घेण्याची मागणी आहे.

आर्वीतील सिव्हील लाईन परिसरात अतिक्रमण धारकांना आपले अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आजपासून अतिक्रमण मोहीम राबविणे सुरू झाले आहे.
- एच. डी. टाकरखेडे
मुख्याधिकारी, न. प. आर्वी

Web Title: Arvite encroachment holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.