आर्वी मार्ग उठलाय नागरिकांच्या जीवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 09:40 PM2019-06-29T21:40:12+5:302019-06-29T21:40:24+5:30
शहरातून आर्वीकडे जाणारा अत्यंत वर्दळीचा मार्ग वाहनचालक, पादचाऱ्यांकरिता जीवघेणा ठरत आहे. मात्र, संबंधितांना सोयरसुतक नाही, रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी वाहनचालक, नागरिकांतून होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातून आर्वीकडे जाणारा अत्यंत वर्दळीचा मार्ग वाहनचालक, पादचाऱ्यांकरिता जीवघेणा ठरत आहे. मात्र, संबंधितांना सोयरसुतक नाही, रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी वाहनचालक, नागरिकांतून होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुनापाणी चौकापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकामाला मंजुरी मिळाली. या रस्त्यावर तब्बल ३५ कोटी रुपये खर्ची घातले जात आहे. मात्र, रस्ता बांधकाम नियोजनाच्या अभावातच पूर्णत्वास जात आहे. रस्त्याचे बांधकाम करण्यापूर्वी भुयारी गटार योजनेकरिता खड्डे तयार करण्यात आले. यानंतर सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. छत्रपती शिवाजी चौक ते आर्वी नाका चौकापर्यंत सिमेंट रस्त्याचे एका बाजूने बांधकाम पूर्णत्वास गेले आहे. मात्र, भुयारी गटार योजनेचे खड्डेच बुजविण्यात आले नाही. हे खड्डे रात्रीच्या सुमारास वाहनचालकांच्या दृष्टीस पडत नसल्याने या मार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे. खड्डयाजवळ गेल्यानंतर वाहनचालकांना एकाएकी दिसत असल्याने ते ब्रेक लावतात. यात अपघात होत आहेत. या मार्गावरून जाताना वाहनचालकांना सर्कसच करावी लागत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित कंत्राटदाराने फलक लावण्याची गरज असताना तेही लावण्यात आले नाही. आर्वी नाका चौक परिसरात शिकवणी वर्ग असल्याने सायंकाळी रस्ता गर्दीने फुललेला असतो. खड्डयांमुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. मोठा अपघात होण्यापूर्वी खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.
पानटपरीचालकांचे अतिक्रमण
आर्वी नाका परिसतरात अनेक व्यावसायिकांकडून रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. पानठेलेचालक ठेल्यातील साहित्य रस्त्यावर थाटतात. पानटपरीवर येणारे ग्राहक रस्त्यावरच आपली वाहने बेशिस्तपणे उभी करतात. येथे वाहतूक पोलीस तैनात असतात. त्यांचेही या प्रकाराकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. यामुळेही अपघाताचा धोका आहे