सायंकाळ होताच सुरू होतो फटाक्यांचा बार; प्रदूषण सीमारेषेपार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 06:35 PM2024-11-07T18:35:10+5:302024-11-07T18:36:46+5:30
Wardha : पर्यावरणाची चिंता राहिली कुणाला?
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दिवाळीला होणारी आतषबाजी अन् त्यातून वाढते प्रदूषण हे समीकरणच झाले आहे वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी सामाजिक संघटनांकडून जनजागृती केली जाते. मात्र, यंदा दिवाळी साजरी करताना शहरातील नागरिकांनी प्रदूषणाचे भान मात्र जपले नाही. त्याचा परिणाम म्हणून की काय, सायंकाळ होताच फटाक्यांचा बार फोडण्यात येत असल्याने प्रदूषण सीमारेषेपार जात असल्याचे वास्तव शहरात दिसून येत आहे. विशेषतः लक्ष्मीपूजन आणि पाडव्याला हवा आणि ध्वनिप्रदूषण उच्चांकी स्तरावर पोहोचले होते. शहरात दिवाळीचा जल्लोष शिगेला पोहोचला असल्याचे चित्र पाहायला मिळाले. कानठळ्या बसविणाऱ्या फटाक्यांबरोबरच धुराचे फटाकेदेखील मोठ्या प्रमाणात फोडले लक्ष्मीपूजनच्या रात्री सर्वत्र अखंडपणे फटाके फुटत होते. फटाक्यांची आतषबाजी मध्यरात्रीपर्यंत सुरू असल्याचे पाहायला मिळाले. मोठ्या . प्रमाणात धूर सोडणाऱ्या फुलवाज्यासारख्या फटाक्यांमुळे हवेत धुराचे ढग तयार झाले होते.
फटाक्यांच्या धुरातून श्वसनविकार बळावतात. विशेषतः आधीपासूनच श्वसनविकार असलेल्या रुग्णांना यामुळे दीर्घकालीन त्रास होऊ शकतो. यामुळे दिवाळीच्या कालावधीत काळजी घेण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी दिला होता; पण त्याची फिकीर कोणालाच दिसली नाही. रात्री उशिरापर्यंत फटाके फोडण्याने हवेत घातक वायूंचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळाले. सायंकाळी ७ ते रात्री १ वाजेपर्यंत शहरात सर्वत्र धूरकट हवा होती. बहुतेक जणांनी इमारतीच्या आवारातच फटाके फोडले. फटाक्यांमुळे निर्माण होणारा धूर बाहेर जाण्यास जागा नसल्याने तेथील हवेचे प्रदूषण तुलनेने जास्तच राहिले, घरांमध्ये आणि आजूबाजूच्या वातावरणातही विषारी हवा दीर्घकाळ राहिली.
या घातक वायूंची भर
फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हवेत सल्फर डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, कार्बन डायऑ क्साइड आणि नायट्रेसची हवेत भर पडली. सायंकाळच्या आतष- बाजीमुळे ते रात्रभर धूलिकणांच्या स्वरुपात हवेत राहिले.
सकाळही होतेय प्रदूषणाचीच
आतषबाजीनंतर उरलेल्या फटाक्यांचे वेस्टण सकाळी गोळा करून ठिकठिकाणी त्यांना आग लावून दिल्याचे दिसून आले. यात काही जळालेले तर काही अर्धज- ळालेल्या फटाक्यांचा समावेश असल्याने पेटविलेल्या कचऱ्यातून प्रदूषण होत आहे. हा प्रकार गेल्या दोन तीन दिवसांपासून सुरू आहे.
फटाक्यांमुळे जखमींची रीघ
दिवाळीत फटाके उडविताना जखमी झालेल्यांनी रुग्णालयात रीघ लावल्याचे पाहायला मिळाले, सांगली व मिरजेतील शासकीय रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभागात जखमींनी उपचार घेतले. यामध्ये मुलांची संख्या अधिक होती.