तुरुंगवासाची शिक्षा ठोठावताच पती न्यायालयातून 'छूमंतर', मदिरालयात पेग रिचवताना सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2022 10:58 AM2022-06-08T10:58:09+5:302022-06-08T13:23:11+5:30
शिक्षा ठोठावताच आरोपीने पोलिसांना चकमा देत न्यायालयातून पळ काढला. पोलिसांनी शोध घेतला असता आरोपी थेट वडकी येथील एका मदिरालयात सापडला.
हिंगणघाट (वर्धा) : पती-पत्नीचा कौटुंबिक वाद विकोपाला जात प्रकरण थेट न्यायालयात पोहोचले. न्यायालयानेही गैरअर्जदार पतीस खावटीची रक्कम भरण्याचे आदेश दिले. पण, गैरअर्जदाराने खावटीची रक्कम न भरल्याने अखेर न्यायालयाने गैरअर्जदारास दोषी ठरवून एक महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. पण, शिक्षा ठोठावताच आरोपीने पोलिसांना चकमा देत न्यायालयातून पळ काढला. पोलिसांनी शोध घेतला असता आरोपी थेट वडकी येथील एका मदिरालयात गवसला.
हिंगणघाट येथील रहिवासी असलेल्या स्मिता प्रवीण पाटील यांचा हिंगणघाट तालुक्यातील फुकटा येथील प्रवीण पाटील यांच्याची सुमारे १२ वर्षांपूर्वी विवाह झाला. पण, काही वर्षांनंतर प्रवीण याने पत्नी व मुलांना घराबाहेर काढले. परिणामी, स्मिता यांनी खावटी संदर्भात न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानेही स्मिता पाटील हिला प्रवीण पाटील याने प्रति महिना तीन हजार रुपये खावटी देण्याचे आदेश दिले. पण, प्रवीण याने खावटीची रक्कम नियमित न दिल्याने स्मिताने पुन्हा न्यायालयात धाव घेत न्यायाची मागणी केली.
या प्रकरणी ॲड. इब्राहीम बख्श यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद व पुरावे लक्षात घेऊन हिंगणघाट येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी दीपक बोरडे यांनी गैरअर्जदार प्रवीण पाटील यास दोषी ठरवून एक महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. न्यायालयात कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांनी शिक्षेस पात्र ठरलेल्या आरोपीस ताब्यात घेतले. पण, नंतर आरोपीने मोठ्या हुशारीने पोलिसांच्या हातावरच तुरी देत न्यायालयाच्या आवारातून सोमवारी दुपारी यशस्वी पळ काढल्याने पोलिसांची धावपळ उडाली.
अन् मदिरालयात सापडला
न्यायाधीशांनीही तुरुंगवासाची शिक्षा ठोठावताच मोठ्या हुशारीने प्रवीण पाटील याने पोलिसांच्या हातावर तुरी देत हिंगणघाट येथील न्यायालयाच्या आवारातून यशस्वी पळ काढला. यामुळे पोलीस प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली होती. पण पोलिसांनीही 'झुकेगा नही..' म्हणत फरार झालेल्या प्रवीणला शोधून काढले. तो वडकी येथील एका मदिरालयात सापडला.