चिमुकला असद घरी जाण्यासाठी निघाला आणि वाटेत नाल्यातून जाताना...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 11:54 AM2020-07-17T11:54:04+5:302020-07-17T11:55:49+5:30
बुधवारी दुपारी सुरू झालेला पाऊस सायंकाळी थांबला. दरम्यान आजीकडे असलेला असद खान घरी जाण्यास निघाला. त्याचवेळी घरासमोर असलेल्या नाला तुडुंब भरून वाहत होता. त्यामुळे घरात जाण्यासाठी पाण्यामधून त्याने जाण्याचा प्रयत्न केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने नाला दुथडी भरून वाहत होता. नाल्याच्या पुलावरून पाणी असताना जात असलेल्या कवडघाट रोडवरील जुन्या कांजी हाऊसजवळील राहणाऱ्या असद खान रमजान खान पठाण या चार वर्षीय बालकाचा वाहत गेल्याने मृत्यू झाला.
बुधवारी दुपारी सुरू झालेला पाऊस सायंकाळी थांबला. दरम्यान आजीकडे असलेला असद खान घरी जाण्यास निघाला. त्याचवेळी घरासमोर असलेल्या नाला तुडुंब भरून वाहत होता. त्यामुळे घरात जाण्यासाठी पाण्यामधून त्याने जाण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळेस त्याच्यासोबत कोणीच नव्हते. आजीच्या घरून निघालेला चार वर्षीय बालक पाण्यातून वाट काढत घरी जाण्यास निघाला. पण, पाण्याचा प्रवाह एवढा होता की तो पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत गेला. कमीत कमी १५ ते २० फूट अंतरापर्यंत तो वाहत गेला. घराशेजारच्या मागील बाजूला असलेल्या नाल्यात वाहत गेला आणि एका काठीला अडकला. घरामागील असलेल्या नालीकाठची विटांची भिंत पडल्याने मोठा आवाज झाला. काय पडले ते पाहण्यासाठी असदची आई गेली असता मुलाचा मृतदेह तरंगताना आढळला.
असदची आई मोलमजुरी करून उदरनिर्वाह करते. तर त्याला पाच वर्षांची बहीणही आहे. काही वर्षांपूर्वी त्याचे वडील कुटुंबीयांना सोडून निघून गेले. आईच मुलांचे पालनपोषण करायची. हा परिसर झोपडपट्टी परिसर म्हणून ओळखला जातो. या झोपडपट्टी परिसरात धड रस्ते नाही, नाल्या नाही. पावसाळ्यात घरामध्ये पाणी साचून राहत असते. अशा परिस्थितीत हे लोक जीवन जगत आहेत. मात्र, याकडे संबंधितांचे दुर्लक्ष आहे.