महामार्गावरील राख ठरतेय धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 11:48 PM2019-06-16T23:48:43+5:302019-06-16T23:49:13+5:30
शहरालगतच्या परिसरातून नागपूर-तुळजापूर महामार्गाचे काम सुरु आहे. या महामार्गाच्या कामात मोठ्याप्रमाणात राख (डस्ट) चा वापर होत असून ही राख आता परिसरातील नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरालगतच्या परिसरातून नागपूर-तुळजापूर महामार्गाचे काम सुरु आहे. या महामार्गाच्या कामात मोठ्याप्रमाणात राख (डस्ट) चा वापर होत असून ही राख आता परिसरातील नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. हवेसोबत परिसरात पसरणारी ही राख अनेकांच्या घरात शिरत असल्याने गृहीणीही त्रस्त झाल्या आहे. त्यामुळे यावर उपाय योजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
शहरालगतच्या पिपरी(मेघे) व सिंदी (मेघे) परिसरात नागपूर-तुळजापूर महामार्गाचे काम सुरु आहे. या महामार्गालगतच काही अंतरावर वस्ती आहे. तसेच या मार्गालगत पर्यायी रस्ताही तयार करण्यात आला आहे. त्यामुळे सतत वाहतूक सुरु असते. महामार्गावर मोठ्या टिप्परच्या सहाय्याने राख आणली जात आहे. या टिप्परमध्ये भरलेली राख जरी वरुन झाकली असली तरी हवेच्या वेगाने ती रस्त्याने उडत असते. परिणामी मागाहून येणाऱ्या वाहनचालकाला त्या राखेचा त्रास सहन करावा लागतो.
उडणारी राख डोळ्यात जात असल्याने डोळ्यांची जळजळ होत आहे. तसेच कपड्यावर उडूनही कपडे खराब होत आहे. अचानक राख डोळ्यात जात असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. संभाव्य धोका लक्षात घेऊन अशा वाहनांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
परिसरातील नागरिक झाले हैराण
सिंदी (मेघे) परिसरात महामार्गाच्या कामात राख वापरली जात असून टिप्परमधून राख खाली उतरविल्यानंतर त्यावर पाणी न मारता तशीच ठेवली जाते. त्यामुळे येणाºया हवेमुळे ती राख उडते. त्यामुळे सर्वत्र धूळ पसरल्याचे दिसून येते. यामुळे पुढचा माणूस किंवा वाहनेही दिसने कठीण होऊ जात आहे. अनेकदा या राखीमुळे किरकोळ अपघातही होत आहे.
उडणारी राख सिंदी (मेघे), विक्रमशीला नगर, थुल ले-आऊट, सावंगी टि-पार्इंट या परिसरातील वस्तीतील घरांमध्ये शिरत आहे. त्यामुळे महिला वर्गांना दिवसातून दोन ते तीन वेळा घर साफ करावे लागत आहे. तसेच विहिरी व घरात साठवून पाण्यावरही ही राख गोळा होत आहे.
या राखीमुळे या परिसरातील वातावरण पुर्णत: धुळयुक्त होत असल्याने परिसरातील नागरिकांना श्वसनाचे व त्वचेचे आजार बळावत आहे. तसेच लहान बालकांनाही घराबाहेर काढणे कठीण झाले आहे. त्यामुळे यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.