आष्टीत एकाच रात्री दोन घरे फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:43 AM2017-10-23T00:43:42+5:302017-10-23T00:45:01+5:30
पेठ अहमदपूर हद्दीतील दोन शिक्षकांच्या घरी दिवाळीनिमित्त बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी हात साफ केला. प्रा. सुरेंद्र अवथरे, नंदकिशोर गायकी या दोघांच्या घरी कपाट फोडून सोने, चांदी, .......
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : पेठ अहमदपूर हद्दीतील दोन शिक्षकांच्या घरी दिवाळीनिमित्त बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी हात साफ केला. प्रा. सुरेंद्र अवथरे, नंदकिशोर गायकी या दोघांच्या घरी कपाट फोडून सोने, चांदी, रोख रक्कम यासह दीड लाखाचा ऐवज लंपास केला. सदर घटना शनिवारी मध्यरात्री घडली.
पोलीस सुत्रानुसार, चोरट्याने प्रा. अवथरे यांच्याकडील चोरीत मुख्य घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. कपाट फोडून त्यातील १५ हजार रोख व सोन्याचा ऐवज असा एकूण ७० हजाराचा मुद्देमाल लंपास केला. तर नंदकिशोर गायकी यांच्याकडे सोन्याचे दागिने व दहा हजार रोख असा एकूण ७९ हजाराचा मुद्देमाल चोरुन नेला. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी प्रकरणाचा तपास करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या हाती काहीच आले नाही. यामुळे इतर चोरीप्रमाणे या चोरीचाही छडा लागेल अथवा नाही याबाबत साशंंकता आहे.
आष्टी शहरात २२ चोºया
आष्टी शहरात यंदाच्या सत्रात २२ चोºया झाल्या. त्यातील एकाही चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले नाही. रात्रगस्त बंद आहे. मार्केट फोडल्यावरही पोलीस जागे झाले नाही. गत आठवड्यात माजी पंचायत समिती सभापती मोहन ढोले यांचे घर फोडून सव्वा लाखाचा ऐवज लंपास केला. त्याचाही छडा लागला नाही. ग्रामपंचायत निवडणुकीच्या दरम्यान बालविकास विस्तार अधिकारी मंगेश टेकाडे यांच्याकडेही चोरी झाली. रिपोर्ट देवूनही पोलीस पोहचले नाही. त्यामुळे नागरिकांत असंतोष पसरत आहे.