आष्टी शहर विकास मोहीम राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 11:57 PM2017-10-01T23:57:19+5:302017-10-01T23:57:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : आष्टी स्वातंत्र्य लढ्यात झालेल्या क्रांतीनंतर शासनाने अद्यापही सोयी-सुविधा पुरविल्या नाहीत. व्यक्तिगत राजकारणामुळे गावाचा विकास खुंटला आहे. शासनाच्या निधीचा गैरवापर करणारे गावाच्या विकासावर बोलू शकत नाहीत. यासाठी जनशक्ती संघटना आष्टी शहर विकास मोहीम राबविणार असल्याची माहिती जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष मकरंद देशमुख यांनी दिली. आष्टी येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सदर माहिती दिली.
मकरंद देशमुख पुढे म्हणाले, आष्टी नगरपंचायत होऊन दोन वर्ष लोटले. गावातील अतिक्रमण, गाळ्यांचा प्रश्न, रोजगार, विकास कामे या सर्वांमध्ये प्रचंड दुर्लक्ष झाले आहे. पालकमंत्र्यांनी राष्ट्रीय स्मारकासाठी दिलेल्या ५ कोटी रूपयांमध्ये गावातील अंतर्गत कामे न करता स्मशानभूमी, बंधारे यावर उधळपट्टी करण्यात आली. यासाठी राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाही. नगर पंचायतचे मुख्याधिकारी काहीही कामे करीत नाही. कपिलेश्वर देवस्थानचा रस्ता अद्याप झाला नाही. बाकळी नदीच्या पात्रात बंधाºयाच्या नावावर ७० लाख रूपये खर्च केले. यामध्ये एका नगरसेवकाने आपला स्वार्थ जोपासला. यासाठी आपण शहर विकास मोहीम राबवून भ्रष्टाचार करणाºयांच्या विरोधात अगदी ठामपणे लढा देणार आहो, आष्टीकरांनी आपल्याला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यापुढे सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणे, तक्रार पेट्या लावणे, प्रसंगानुरूप आंदोलनाचा भूमिका घेणे, शहरातील ४७ वर्ष पूर्वीच्या पाणी पुरवठा योजना कालबाह्य झाली आहे. त्यामुळे दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे. परिणामी, नवीन योजना सुरू करण्यासाठी शासनाचे लक्ष वेधने, शेतमालाला भाव मिळवून देण्यासाठी लढा दिला जाईल असेही मकरंद देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी रामदास चरडे, संजय जाणे, रशीद खान, नासीरभाई, राजेश सोळंकी, नासीर अली, आनंद निबंकर आदींची उपस्थिती होती.