आष्टीच्या तलाठी कार्यालयाला लागली गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 11:56 PM2019-09-01T23:56:09+5:302019-09-01T23:58:00+5:30
अनेक वर्षांपासून या इमारतीची डागडुजी झालेली नसून येथे अद्ययावत तलाठी कार्यालय बांधून देण्याची मागणी कित्येक दिवसांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात टाकून कामकाज करावे लागत असल्याचे तलाठी सांगतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : येथील तहसील कार्यालयाच्या शेजारी असलेल्या तलाठी कार्यालयाचे गेल्या दोन वर्षापासून खस्ताहाल आहे. छताचे प्लॅस्टर निघाले असून फ्लोरिंगही उखडलेले आहे. त्यामुळे पावसात या इमारतीच्या छताला धारा लागत असल्याने कामकाज करताना तलाठ्यांची मोठी पंचाईत होत आहे. या दुरवस्थेमुळे छत अंगावर पडण्याचीही भीती निर्माण झाली असून जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे.
येथील तलाठी कार्यालयामध्ये सामान्य नागरिक दररोज सातबारा, आठ अ, नकाशा, चतुर सीमा, फेरफार पंजी यासह जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले मिळविण्याकरिता या कार्यालयात येतात.पण, या कार्यालयात कर्मचारी आणि दस्तऐवज ठेवण्यासाठी अडचणीचे जात असल्याने आलेल्यांनाही उभे राहण्यासाठी जागा नाही. अशावेळी सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांची व शेतकऱ्यांची मुस्कटदाबी होत आहे. आष्टी हे तालुक्याचे ठिकाण असून या ठिकाणी शासनाने अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजे, मात्र असे होताना दिसत नाही. परिणामी गळणाºया पाण्यामुळे कार्यालयातील महत्त्वाचे दस्तऐवजही ओले होत असल्याने धोक्यात आले आहे. त्यामुळे हे कार्यालय आता कार्यरत कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्यांसाठीही असुरक्षित झाल्याची ओरड होत आहे.
तलाठी कार्यालयाची इमारत बळकावली
अनेक वर्षांपासून या इमारतीची डागडुजी झालेली नसून येथे अद्ययावत तलाठी कार्यालय बांधून देण्याची मागणी कित्येक दिवसांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात टाकून कामकाज करावे लागत असल्याचे तलाठी सांगतात. आष्टी तहसील कार्यालयाच्या परिसरांमध्ये तलाठी कार्यालय बांधकाम झाल्यावर याठिकाणी दुय्यम निबंधकांनी मुद्रांक विक्रेत्यांचे कार्यालय हलविले आणि तलाठी कार्यालयाला पर्यायी जागा दिली. ही पर्यायी जागा वाहन ठेवण्याच्या बाजूलाच असल्यामुळे या ठिकाणी कुठल्याही क्षणी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.