आष्टीचे ग्रामीण रूग्णालय कागदोपत्री झाले सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 10:17 PM2018-01-04T22:17:46+5:302018-01-04T22:18:10+5:30
शहरात दोन वर्षांपूर्वी बांधकाम पूर्ण झालेले ग्रामीण रुग्णालय सुरू झाल्याचा अहवाल आरोग्य उपसंचालक नागपूर यांनी राज्य शासनाला पाठविला आहे. वास्तविक, सर्व कागदोपत्री दिसून येत आहे. यंत्रसामुग्री नाही, डॉक्टर नाही, औषध नाही, सर्व सुविधा नाहीच.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (श.) : शहरात दोन वर्षांपूर्वी बांधकाम पूर्ण झालेले ग्रामीण रुग्णालय सुरू झाल्याचा अहवाल आरोग्य उपसंचालक नागपूर यांनी राज्य शासनाला पाठविला आहे. वास्तविक, सर्व कागदोपत्री दिसून येत आहे. यंत्रसामुग्री नाही, डॉक्टर नाही, औषध नाही, सर्व सुविधा नाहीच. या नाहीच्या पाढ्याला होकारात बदलण्यात शासकीय अधिकाºयांनी बाजी मारल्याचेच दिसून येत आहे.
सध्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीतून प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू आहे. याप्रकरणी आष्टीकरांनी वारंवार तक्रारी केल्या. तेव्हा विधानसभेत आ. अमर काळे यांनी आरोग्यमंत्र्यांना जाब विचारला. यावर सहा महिन्यांत ग्रामीण रुग्णालय सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले. नुकतेच हिवाळी अधिवेशन पार पडले. यानंतर ग्रामीण रुग्णालयाच्या आस्थापनेकरिता २ डॉक्टर, ६ नर्स, १ ब्रदर अशी ९ कर्मचारी आष्टीला पाठविण्यात आले आहेत. त्यांना बसायला फर्निचर नाही. तपासणीची यंत्रसामुग्री नाही. आलेले डॉक्टरही वर्धेला सेवा देत आहेत. अशा स्थितीत येथील ग्रामीण रुग्णालय कागदोपत्री सुरू झाल्याची ओरड ग्रामस्थ करीत आहे.
योग्य उपचार मिळत नसल्याने रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. मानवी दृष्टीकोन ठेवून आरोग्यमंत्र्यांनी ग्रामीण रुग्णालय सुरू करावे, जनतेच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये, असा इशारा अंतोरा येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश ठाकरे, डॉ. नरेंद्र देशमुख, गजानन आंबेकर, दिनेश मानकर यांनी दिला आहे.
मागील वर्षी उपचारांअभावी १५ रुग्णांचे गेले प्राण
मागील वर्षी १५ जणांचा विविध कारणांमुळे उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. आष्टी शहरापासून वर्धा ८५ किमी, नागपूर ११५ किमी तर अमरावती ७२ किमी आहे. या ठिकाणी उपचारासाठी जाताना विलंब होतो. रुग्ण वेळेवर पोहोचू शकत नसल्याने त्यांची प्राणांशी गाठ असते. शिवाय रुग्णवाहिकेची सुविधा नाही. यामुळे रुग्णांचा बळी जात असल्याचे वास्तव आहे.
आष्टी येथील ग्रमीण रुग्णालय १ डिसेंबर २०१७ पासून सुरू झाले आहे. कर्मचारी व डॉक्टर दिले आहे. औषध, यंत्रसामुग्री व बेडची व्यव्स्था लवकरच देण्यात येईल. शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व सुविधा पुरविण्यात येणार आहे.
- डॉ. पुरूषोत्तम मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.