शासन दरबारातून आष्टीचे ‘शहीद’ हरविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:41 AM2018-08-15T00:41:30+5:302018-08-15T00:42:36+5:30
आष्टी शहरातील ग्रा.पं.ला नुकताच नगर पंचायतीचा दर्जा देण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर या शहराला यापूर्वी तालुक्याचा दर्जा मिळाला आहे. असे असले तरी गत अनेक वर्षांपासून शहिदांची भूमी असलेल्या आष्टीची शासन दरबारी आष्टी (शहीद) अशी नोंद घेण्यात आलेली नाही.
अमोल सोटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : आष्टी शहरातील ग्रा.पं.ला नुकताच नगर पंचायतीचा दर्जा देण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर या शहराला यापूर्वी तालुक्याचा दर्जा मिळाला आहे. असे असले तरी गत अनेक वर्षांपासून शहिदांची भूमी असलेल्या आष्टीची शासन दरबारी आष्टी (शहीद) अशी नोंद घेण्यात आलेली नाही. त्यामुळे सरकारच्या कार्यप्रणालीवर सुजान नागरिकांकडून विविध प्रश्न उपस्थित केले जात असून शासन दरबारी आष्टीची नोंद आष्टी (शहीद) अशी करण्याची मागणी आहे.
वर्धा नदीच्या खोऱ्यातील आष्टी तालुक्याची निर्मिती व्हावी यासाठी १९७८ पासून येथील जनता व स्वातंत्र्य संग्राम सैनिक प्रयत्नरत होते. १९८१ मध्ये महाराष्ट्र शासनाने विदर्भातील तालुक्यांच्या पुनर्रचनेचा निर्णय घेतल्याने स्वातंत्र्यसेनानी गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने १८ मार्च १९८१ ला तत्कालीन मुख्यमंत्र्यांची भेट घेवून आष्टी तालुका करण्याची मागणी केली. विभागाचे तत्कालीन आ. शिवचंद चुडीवा व केंद्रीय मंत्री वसंत साठे यांनी या बाबीचा पाठपुरावा केला. ९ आॅगस्ट १९८२ ला आष्टीतील शहीद स्मारकाच्या उद्घाटन प्रसंगी तालुका निर्मितीसाठी शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार घालण्यात आला. १६ आॅगस्ट १९८२ ला शहीद स्मारकाजवळ एक हजार लोकांनी साखळी उपोषण सुरू केले. ४५ दिवस चाललेले हे उपोषण बाबासाहेब भोसले यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. तत्कालीन पालकमंत्री सुब्रमण्यम् यांनी तालुका निर्मितीच्या मागणीची पार्श्वभूमी समजावून घेतली. १५ सप्टेंबर १९८२ ला पवनार येथे आष्टीच्या मागणी मंडळाने राजीव गांधी यांची भेट घेतली. स्वातंत्र्यसेनानी गुलाबराव वाघ यांच्यासह आष्टी परिसरातील स्वातंत्र्य सैनिकांना यापुढे उपोषणास बसण्याची वेळ येणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, तालुका न बनल्यामुळे २ आॅक्टोबर १९८२ ला गांधी जयंतीदिनी हुतात्मा स्मारकावर स्वातंत्र्य संग्राम सैनिक परसराम सव्वालाखे, सय्यद वहाब बाबा, रामचंद्र जवळेकर, डांगे बुवा यांनी बेमुदत उपोषण सुरू केले. तेव्हा बाबासाहेब भोसले, वित्तमंत्री सुब्रमण्यम्, ना. सुरेंद्र भुयार यांच्या आश्वासनामुळे उपोषण मागे घेण्यात आले. नंतर मंत्रीमंडळ बदलल्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सुत्रे ना. वसंत पाटील यांच्या हातात आली. २ आॅक्टोबर १९८३ ला सेवाग्राम येथील बापुकुटीत आले. त्यावेळी त्यांनी आष्टी (शहीद) तालुका निर्माण करण्याचे जाहीर केले. पुढे शासकीय अटीचे सोपस्कार पूर्ण करुन १५ आॅगस्ट १९८४ ला आष्टी तालुक्याची स्थापना झाली. तालुका स्थापनेच्या निर्मितीसाठी श्रीधर ठाकरे यांचा मोलाचा वाटा होता. त्यावेळी आष्टी इतकीच नोंद झाली. तालुक्यातील स्वातंत्र्यसेनानी, नागरिक, अधिकारी प्रत्येक ठिकाणी आष्टी (शहीद) असे सांगायचे स्वातंत्र्य लढ्याची नोंद जगाच्या इतिहासात असल्यावर आष्टी (शहीद) अशी नोंद शासन दरबारी झाली नाही. गेल्या ३२ वर्षांपासून ही मागणी शासनदरबारी प्रलंबित आहे. देशाच्या पतंप्रधानापासून सर्वच दिग्गज श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येतात; पण त्यांच्याकडून केवळ आश्वासनेच दिली जात असून आश्वासन पूर्तता अद्यापही झालेली नाही. शहीद स्मृती दिनाच्या वेळी आष्टी या शहीद भूमीतील सुजान नागरिक आष्टी (शहीद) अशी नोंद कधी होणार, असे विचारत असल्याचे वास्तव आहे. आष्टी या शहराचा ऐतिहासीक वारसा लक्षात घेत या शहराची नोंद शासन दरबारी आष्टी (शहीद) अशी घ्यावी, ही मागणी आहे.
अनेक जण होतात नतमस्तक
शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येने नागरिक येथे येतात. शासनाच्या विविध विभागाचे बडे अधिकारी, लोकप्रतिनिधी येथे श्रद्धांजली अर्पण करतात. त्यांच्या माध्यमातून आष्टी शहराला आष्टी (शहीद) म्हणून नोंद करण्याचे प्रस्तावित करण्यात आल्याचे सांगितल्या जाते; पण अजुनही तशी नोंद सरकारने घेतलेली नाही. सदर नोंद घेण्यासाठी आणखी किती दिवस आष्टीकरांना प्रतीक्षा करावी लागेल, असा सवाल तालुक्यातील नागरिकांकडून विचारला जात आहे.
तालुका कचेरीवर ‘आष्टी’च
येथील तहसील कार्यालयाच्या इमारतीवर ‘तहसील कार्यालय आष्टी’ असा मजकूर लिहून आहे. हाच प्रकार इतर शासकीय कार्यालय बारकाईने बघितल्यावर दिसून येतो. आष्टी शहराचा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी या कार्यालयांवर केवळ आष्टी असे न लिहिता आष्टी (शहीद) असे लिहिण्यात यावे, अशी मागणी आहे.
ठरावानंतरच नामकरणाला हिरव्या झेंडीची शक्यता
कुठल्याही गावाच्या अथवा शहराच्या नावात बदल करावयाचा असल्यास तेथील स्थानिक स्वराज्य संस्थेत तसा सर्वानुमते ठराव घेणे क्रमप्राप्त आहे. सदर ठराव बहूमताने पारीत झाल्यावर तो जिल्हाधिकाºयांना सादर करावा लागतो. त्यानंतर तो संबंधितांकडे सादर होत संबंधित वरिष्ठ अधिकारी गाव अथवा शहराच्या नावातील बदलाला हिरवी झेंडी देत असल्याचे सांगण्यात आले.
आष्टी या शहराची शासकीय रेकॉर्डवर आष्टी एवढी नोंद आहे. आष्टी (शहीद) अशी शासन दरबारी नोंद करण्यासाठी नगरपंचायतीत ठराव घेवून तो संबंधितांना व सरकारला पाठविल्या जाणार आहे. तसेच या संदर्भात आपण स्वत: संबंधितांकडे पाठपुरावा करू.
- अनिता भातकुलकर, नगराध्यक्ष, आष्टी (शहीद).
आष्टी या शहराची आष्टी (शहीद) अशी नोंद शासनदरबारी व्हावी, अशी मागणी कुणी आपल्याकडे केल्यास आपण त्या संदर्भाने जिल्हाधिकाºयांच्या मार्गदर्शनात संबंधितांना प्रस्ताव पाठवू.
- सीमा गजभिये,
तहसीलदार, आष्टी (शहीद).