नमुने तपासणीसाठी मागतात पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:06 AM2018-08-11T00:06:47+5:302018-08-11T00:07:21+5:30
समुद्रपूरच्या ग्रामीण रूग्णालयाच्या परिसरामध्ये असणारी उपविभागीय पाणी नमुने तपासणी प्रयोगशाळा ही रामसभरोसे आहे. सदर प्रयोगशाळा ही फक्त एक शिपाई चालवित असल्याचे दिसून आले. समुद्रपूरमध्ये नगरपंचायत अंतर्गत वॉर्ड क्र. ५ व ६ मध्ये पंधरा दिवसांपासून पिण्याच्या पाण्याच्या नळाला दुर्गंधीयुक्त पिवळसर पाणी............
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : समुद्रपूरच्या ग्रामीण रूग्णालयाच्या परिसरामध्ये असणारी उपविभागीय पाणी नमुने तपासणी प्रयोगशाळा ही रामसभरोसे आहे. सदर प्रयोगशाळा ही फक्त एक शिपाई चालवित असल्याचे दिसून आले. समुद्रपूरमध्ये नगरपंचायत अंतर्गत वॉर्ड क्र. ५ व ६ मध्ये पंधरा दिवसांपासून पिण्याच्या पाण्याच्या नळाला दुर्गंधीयुक्त पिवळसर पाणी येत असल्याने सदर पाणी एका बॉटलमध्ये पॅक बंद करून पंचाच्या सह्या घेऊन सील करण्यात आले. त्याची माहिती नगरपंचायतला देवून हे पाणी पिण्या योग्य आहे किंवा नाही याची तपासणी करण्याकरिता स्थानिक उपविभागीय पाणी नमुने तपासणी प्रयोग शाळेत नागरिक पोहचले असता तेथे अधीक्षकांच्या खुर्चीमध्ये एकमेव शिपाई बसून दिसल्याचे आढळून आले.
याबद्दल त्याला विचारणा केली असता सदर शिपायाने या तपासणी करीता पैसे लागते, असे सांगितले. या संदर्भात संबंधित कोणीही अधीक्षक,तंत्रज्ञ उपस्थित नसल्याने याबद्दची कोणाला तक्रार करावी हा प्रश्न उपस्थित झाला होता. तेव्हा सदर शिपायाला अधिकाऱ्याचे दुरध्वनी नंबर मागितले असता ते सुद्धा देण्यास टाळाटाळ केली.
त्यानंतर त्याने काही वेळाने तंत्रज्ञ पोहणकर यांचा भ्रमणध्वनी क्रमांक दिला. त्यानुसार सदर तंत्रज्ञासोबत भ्रमणध्वनीवरून चर्चा केली असता रासायनिक तपासणी करीता सतराशे रूपये तर जैविक तपासणी करिता आठशे रूपये घेत असल्याचे सांगितले.
नागरिकांचे आरोग्य सांभाळण्याकरिता शाासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविल्या जाते. परिसरात स्वच्छता, पाणी स्वच्छता यावर शासन लाखो रूपये खर्च करते तर मग या तपासणीकरिता इतकी मोठी तपासणी फी कशाची याचा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
म्हणजेच अशा प्रकारचे कुठलेही पाणी पिण्यायोग्य आहे किंवा नाही याची तपासणी आता कुणाकडे करावी हा प्रश्न सुद्धा नागरिकांकडे उभा ठाकला आहे. म्हणजेच सदर विभाग हा नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा दिसून येत आहे.
सदर विभाग अधीक्षक दोन तंत्रज्ञ व एक शिपाई असा कर्मचारी वर्ग असताना या ठिकाणी फक्त एक शिपाई प्रयोग शाळेचा कार्यभार सांभाळत असल्याचे दिसून येते.
सदर विभाग भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा वर्धा यांच्या अंतर्गत चालविला जात असून हा विभाग महाराष्ट्र शासनाचा पाणीपुरवठा स्वच्छता विभाग अंतर्गत येतो. मात्र दोन्ही विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. या यंत्रणेत अनेक पदे रिक्त असून कंत्राटी कर्मचाºयांच्या भरोश्यावर काम चालविले जात आहे. त्यामुळे ते कधी कार्यालयात येतात कधी येतही नाही त्यामुळे नागरिकांना शिपाईच सांभाळून ेघेतो असा हा प्रकार आहे.
पाण्याबाबत तक्रारीच्या संख्येत वाढ
शहरी, व ग्रामीण भागात नद्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. काही ठिकाणी फिल्टर प्लॅन्ट लावण्यात आले आहे. तर काही ठिकाणी पाण्यात तुरटी व ब्लिचींग पावडरचा वापर करून पाणी शुध्द केले जाते. अशी अवस्था आहे. ग्रामीण भागात अनेक गावात जुन्या पाईप लाईन आहेत. त्या जागोजागी फुटलेल्या आहेत. तेथून घाण पाणी पाईप मध्ये जाते या साºया प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होते.