पिनकोड विचारून ४३ हजार काढले
By admin | Published: March 17, 2016 02:43 AM2016-03-17T02:43:59+5:302016-03-17T02:43:59+5:30
बँकेचा मॅनेजर बोलत असल्याचे सांगून एटीएमचा पिन विचारला. यासाठी १६ फेबु्रवारी रोजी मोबाईलवर कॉल आला होता.
देलवाडी येथील प्रकार : अंगणवाडी सेविकेची फसवणूक
आष्टी (शहीद) : बँकेचा मॅनेजर बोलत असल्याचे सांगून एटीएमचा पिन विचारला. यासाठी १६ फेबु्रवारी रोजी मोबाईलवर कॉल आला होता. यानंतर खात्यातून प्रथम ४३ हजार २०४ व नंतर चार हजार रुपये परस्पर काढण्यात आले. हा प्रकार देलवाडी येथील अंगणवाडी सेविका शीतल राजू कोहळे यांच्याशी घडला. याबाबत आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार शीतल कोहळे यांना १६ फेब्रुवारी रोजी फोन आला. यात मी बँक मॅनेजर बोलतो. आपले एटीएम कार्ड बंद झाले आहे. पिनकोड व एटीएम कार्डच्या मागील नंबर सांगा, असे सांगितले. लक्षात न आल्याने त्यांनी माहिती दिली. यानंतर फसवणुकीची शक्यता लक्षात आल्याने १७ फेब्रुवारी रोजी ५ हजार रुपये काढले. यावेळी खात्यात ७१ रुपये होते. यानंतर १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० वाजता बँक आॅफ इंडिया अंतोरा शाखेत जाऊन घडलेला प्रकार बँक व्यवस्थापकांना सांगितला. यावेळी खाते लॉक करण्यास सांगितले. व्यवस्थापकांनीही लगेच खात लॉक केल्याचे सांगितले. यामुळे शीतल निश्चिंत झाल्या होत्या. यानंतर २ मार्च रोजी बचत गटाच्या लोनचे २९ हजार ८६५ रुपये जमा झाले. २ मार्च रोजी २ हजार रुपये मानधन जमा झाले. यानंतर ११ मार्च रोजी थकबाकी वाढीव मानधन ११ हजार ३३८ रुपये व १५ मार्च रोजी ४ हजार ५१० रुपये मानधन जमा झाले. खात्यात एकूण ४७ हजार ७०३ रूपये एवढी रक्कम जमा झाली होती. शीतल १५ मार्च रोजी दुपारी १.३० वाजता बँकेत पैसे काढण्यासाठी गेल्या असता ४३ हजार २०४ रुपये चोरी गेल्याचे बँकेतून सांगण्यात आले. यावेळी खात्यात केवळ ४ हजार ५१० रुपये शिल्लक राहिले होते. यातून शीतल यांनी १६ मार्च रोजी ४ हजार रुपये काढले.
सदर रक्कम कुणी काढली, याची चौकशी करून रक्कम खात्यात वळती करावी, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा बँकेसमोर उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला. पोलीस यंत्रणेनेही चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी तक्रारीतून केली आहे.(प्रतिनिधी)