दारूविक्रेत्याचा पोलीस शिपायावर प्राणघातक हल्ला
By admin | Published: April 6, 2017 12:04 AM2017-04-06T00:04:19+5:302017-04-06T00:04:19+5:30
पोलीस मुख्यालयात कार्यरत पोलीस शिपाई नितेश देवराव वाघमारे याच्यावर दारूविक्रेता शंकर जोगे व सात जणांनी प्राणघातक हल्ला केला.
हिंगणघाट : पोलीस मुख्यालयात कार्यरत पोलीस शिपाई नितेश देवराव वाघमारे याच्यावर दारूविक्रेता शंकर जोगे व सात जणांनी प्राणघातक हल्ला केला. ही घटना मंगळवारी रात्री मांडगाव येथे घडली. दोन मद्यपी मित्रांसोबत तो दारूविक्रेत्याच्या घरी गेला होता. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तीन आरोपींना जेरबंद केले.
पोलीस सुत्रानुसार, रामनवमीच्या बंदोबस्तासाठी पोलीस शिपाई नितेश वाघमारे याची ड्युटी लागली होती. कर्तव्य पूर्ण केल्यानंतर तो मांडगाव येथे गेला. तेथे त्याला मित्र सतीश तिमांडे व नरेश पाहुणे हे दोघे भेटले. त्यानंतर तिघेही दारूविक्रेता शंकर जोगे याच्या घरी गेले. सतीश व नरेश दोघे मद्यपान करीत असताना शंकर जोगे याने तू पोलिसाला माझ्या घरी का आणले असे म्हणत वाद घातला. दरम्यान, नितेश वाद सोडविण्यासाठी गेला असता त्याला शंकर जोगे, प्रकाश जोगे, आशा जोगे व इतर चार जणांनी जबर मारहाण केली. ते इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी चक्क पोलीस शिपाई असलेल्या नितेश याच्या गळ्यात दोर टाकून त्याला जीवे ठार करण्याच्या उद्देशाने १५ फुट ओढत नेले. याबाबत नितेश वाघमारे याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यातील शंकर, प्रकाश व आकाश जोगे यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.(तालुका प्रतिनिधी)