‘पत्नीच्या शेजारी का बसला’ म्हणत कर्तव्यावरील पोलिसांना मारहाण भोवली; पतीस कारावासासह दंड
By महेश सायखेडे | Published: December 9, 2022 04:41 PM2022-12-09T16:41:36+5:302022-12-09T16:43:26+5:30
महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या पतीस न्यायालयाने ठोठावली शिक्षा
वर्धा : ‘पत्नीच्या शेजारी का बसला’ असे म्हणत वाद करून थेट दोन पोलिसांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या पतीला जिल्हा व सत्र न्यायालयाने सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अयफाज जमीर शेख असे शिक्षेस पात्र ठरलेल्या आरोपीचे नाव आहे.
वर्धा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश-२ आर. व्ही. अदोने यांनी आरोपी अयफाज जमीर शेख याला भांदविच्या कलम ३५३ अन्वये सहा महिन्यांचा सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड तसेच कलम २९४ अन्वये एक महिन्यांचा सश्रम कारावास व ५०० रुपये दंड आणि कलम ५०६ अन्वये सहा महिन्यांचा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
अशी घडली होती घटना
पोलिस शिपाई मनोज सुखदेव सूर्यवंशी व महिला पोलिस शिपाई पूजा अनिल गिरडकर हे पोलिस स्टेशन कारंजा येथे सन २०२० मध्ये कार्यरत होते. कोविड काळातील लॉकडाऊन काळात २३ मे २०२० रोजी महिला पोलिस शिपाई पूजा गिरडकर या सायंकाळी ड्यूटी असताना रात्री १०.३० ते ११.३० वाजताच्या सुमारास पोलिस स्टेशनचा विद्युत पुरवठा अचानक खंडित झाला. लाईट गेल्याने व वायरलेसचा डी. सी. आणि सी. टी. एन. एस.चा गोषवारा पोलिस अधीक्षक कार्यालयास पाठवायचा असल्याने मनोज सूर्यवंशी हे पूजा हिला संबंधित गोषवारा वाचून दाखवित होते.
दरम्यान महिला पोलिस शिपाई पूजा गिरडकर हिचा पती अयफाज जमीर शेख हा तेथे आला. त्याने मनोज सूर्यवंशी यांना तू माझ्या पत्नीच्या शेजारी बसून काय करीत आहे, असे म्हणून वाद घातला. आरोपी अयफाज जमीर शेख इतक्यावरच थांबला नाही तर त्याने शिवीगाळ करून मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर याप्रकरणी कारंजा पोलिस ठाण्यात तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद घेण्यात आली होती. या प्रकरणाचा संपूर्ण तपास पोलिस निरीक्षक आर. टी. शेटे यांनी पूर्ण करून प्रकरण न्यायाप्रविष्ट केले.
आठ साक्षदारांची तपासली साक्ष
याप्रकरणी न्यायालयात एकूण आठ साक्षदारांची साक्ष तपासण्यात आली. पैरवी अधिकारी म्हणून सहा. पोलिस निरीक्षक अशोक सोनटक्के यांनी काम पाहिले. शासकीय बाजू ॲड. चारूशिला पौनिकर यांनी पाहिले. दाेन्ही बाजूचा युक्तिवाद आणि पुरावे लक्षात घेऊन न्यायाधीश आर. व्ही. अदोने यांनी आरोपीस शिक्षा ठोठावली.