पोलिसांवर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 11:41 PM2018-09-08T23:41:40+5:302018-09-08T23:42:10+5:30
दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नाकेबंदी करून वाहनांची तपासणी करीत असलेल्या सहाय्यक फौजदार उमेश हरणखेडे यांच्यासह काही पोलीस कर्मचाऱ्यांवर व अधिकाऱ्यांच्या अंगावर एका दारूविक्रेत्याने त्याच्या ताब्यातील चार चाकी वाहन थेट नेऊन प्राणघातक हल्ला केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा / समुद्रपूर : दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नाकेबंदी करून वाहनांची तपासणी करीत असलेल्या सहाय्यक फौजदार उमेश हरणखेडे यांच्यासह काही पोलीस कर्मचाऱ्यांवर व अधिकाऱ्यांच्या अंगावर एका दारूविक्रेत्याने त्याच्या ताब्यातील चार चाकी वाहन थेट नेऊन प्राणघातक हल्ला केला. ही घटना समुद्रपूर-शेडगाव मार्गावर शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी समुद्रपूर पोलीस ठाण्यात सदर दारूविक्रेत्याविरुद्ध भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोळा या सणादरम्यान परिसरात शांतता व सुव्यवस्था कायम राहवी. शिवाय दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या हेतेने समुद्रपूर पोलीस ठाण्याच्यावतीने विशेष मोहीम राबवून ठिकठिकाणी नाकेबंदी करून वाहनांची तपासणी शुक्रवारी करण्यात आली. याच विशेष मोहिमेचा एक भाग म्हणून समुद्रपूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार उमेश हरणखेडे व त्यांचे काही सहकारी समुद्रपूर-शेडगाव मार्गावरील समुद्रपूर शिवारातील कॅनल जवळ नाकेबंदी करून वाहनांची तपासणी करीत होते. याचवेळी एम.एच. ४९ ए. एफ. ०७०३ क्रमांकाची कार येत असल्याने त्याच्या चालकाला वाहन थांबविण्याचा इशारा पोलिसांनी दिला. परंतु, सदर वाहनचालकाने वाहन न थांबविता सहाय्यक फौजदार हरणखेडे यांना ठार करण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर वाहन नेत प्राणघातक हल्ला केला. आरोपी वाहनचालक इतक्यावरच थांबला नाही तर त्याने त्याच्या ताब्यातील वाहनाने एम. एच. ३२ जे. ०१८७ क्रमांकाच्या पोलिसी वाहनास तसेच एका पोलीस अधीकाऱ्याच्या एम.एच. ३२ ए.एच. ३१०४ या खासगी वाहनाला धडक देत तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यात सदर दोन्ही वाहनांचे बऱ्यापैकी नुकसान झाले आहे.
पोलिसांनी एम.एच. ४९ ए. एफ. ०७०३ क्रमांकाची कार अडवून पाहणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात दारूसाठा आढळून आला. तो पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपी कारचालकाविरुद्ध समुद्रपूर पोलीस ठाण्यात अप. क्र. ४८९/१८ कलम ३०७, ३३२, ३३३, ४२७, भादंवि सह कलम ६५(अ)(ई)७७(अ)मु.दा.का. कलम ११९/१७७, १८४ मोवाका कलम ३ सार्वजनिक मालमत्तेस हानी प्रतिबंधक अधिनियम १९८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पारडकर करीत आहेत.
अधिकाऱ्यांसह तीन पोलीस कर्मचारी जखमी
दारू भरलेल्या कारच्या चालकाने समुद्रपूर पोलिसांच्या शासकीय वाहनाला धडक देत पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पारडकर यांच्या खासगी वाहनाला धडक दिली. या घटनेत समुद्रपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रविण मुंडे व दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. याप्रसंगी काळोखाचा फायदा घेत दारूची वाहतूक करणाºया कारच्या चालकाने घटनास्थळावरून यशस्वी पळ काढला. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.