विधानसभा निवडणूक; हिंगणघाट कुणाचे; सेनेचे की भाजपचे, संभ्रम कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 01:49 PM2019-07-26T13:49:32+5:302019-07-26T13:50:56+5:30
हिंगणघाट विधानसभा मतदार संघात भाजपचे विद्यमान आमदार समीर कुणावार यांची मजबूत पकड असल्याचे दिसून येत आहे.
अभिनय खोपडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : हिंगणघाट विधानसभा मतदार संघात भाजपचे विद्यमान आमदार समीर कुणावार यांची मजबूत पकड असल्याचे दिसून येत आहे. २०१४ मध्ये त्यांनी ६५ हजारांवर अधिक मताधिक्यांनी निवडणूक जिंकल्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणूकीतही भाजपला ३८ हजारांवर अधिक मताधिक्य मिळवून दिले. गेल्या साडेचार वर्षात या भागात कुणावारांच्या नेतृत्वात पक्ष संघटन मजबूत झाले. त्यामुळे या मतदार संघावर भाजपने आपला प्रबळ दावा ठेवला आहे. पुन्हा कुणावारांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. दूसरीकडे गेल्या २५ वर्षांपासून सेना-भाजप युतीमध्ये हिंगणघाट मतदार संघ शिवसेनेकडे राहात आला आहे. त्यामुळे शिवसेनेने या मतदार संघावर आपला मजबूत दावा केला आहे. मातोश्रीवर अलीकडेच झालेल्या बैठकीत माजी आमदार अशोक शिंदे यांना कामाला लागा, असे सांगण्यात आले, अशी चर्चा शिवसेनेच्या वर्तूळात आहे. जिल्ह्यातील हा एकमेव मतदार संघ शिवसेना सोडणार नाही, असा दावाही शिवसेनेचे पदाधिकारी करीत आहे. काही जरी असले तरी विद्यमान आमदाराची प्रबळ कामगिरी पाहू जाता भारतीय जनता पक्ष हिंगणघाट शिवसेनेला देईल, अशी शक्यता कमी आहे. दुसरीकडे कॉँग्रेस- राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीत हा मतदार संघ राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कोट्यात आहे. राष्ट्रवादीकडे माजी आमदार प्रा. राजु तिमांडे, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दिवाकरराव गमे हे प्रबळ दावेदार आहेत. या उमेदवारांनी शरद पवारांच्या उपस्थितीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या मतदार संघात कुणबी मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्याखालोखाल तेली समाजाचे मतदार आहे. २०१४ मध्ये मोदी लाट व व्यक्तीगत समीर कुणावार यांचा जनसंपर्क यामुळे या भागातील सामाजिक व जातीय समिकरण निवडणूकीत हद्दपार झाले. त्यामुळे यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षही कुणाला उमेदवारी देते हे पाहणे महत्वाचे राहणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉँग्रेसने मनसेसोबत आघाडी केल्यास हा मतदार संघ मनसेला सोडला जाईल, अशी चर्चा आहे. मनसेकडून येथे अतुल वांदिले हे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसने आपला उमेदवार दिला तरीही मनसे ही जागा लढवेल, असे सांगण्यात येत आहे. याशिवाय वंचित बहूजन आघाडी, बहूजन समाज पार्टी, विदर्भ राज्य आंदोलन समिती आदी येथे आपले उमेदवार मैदानात उतरविणार आहे. विदर्भवादी नेते अनिल जवादे यांनी निवडणुक प्रचाराला सुरुवात केली आहे. या भागात शेतकरी संघटनेचेही मोठ्या प्रमाणावर प्राबल्य आहे. शेतकरी संघटना नेमकी काय भूमिका उमेदवारीबाबत घेते, हेही महत्वाचे राहणार आहे. मात्र समीर कुणावार यांनी गेल्या निवडणूकीत मिळविलेले मताधिक्य व लोकसभेत भाजपला मिळालेली आघाडी या भाजपसाठी जमेच्या बाजू आहेत.
कॉँग्रेसची स्थिती अतिशय कमकुवत
वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट मतदार संघात कॉँग्रेस पक्षाची स्थिती अतिशय कमकुवत आहे. हिंगणघाट तालुक्यातील देवळी मतदार संघाच्या भागात कॉँग्रेसचे दखलपात्र नेते असले तरी हिंगणघाट विधानसभा मतदार संघात मात्र कॉँग्रेस पक्षाचे संघटन अतिशय खिळखिळे झालेले आहे. गेल्या लोकसभा निवडणूकीत सुधीर कोठारी व प्रा. राजू तिमांडे यांनी कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. विधानसभेतही कॉँग्रेसकडे फार प्रबळ दावेदार नाहीत.
व्यक्तीगत जनसंपर्कात कुणावार भारी
हिंगणघाट, समुद्रपूर व सेलू तालुक्याच्या दोन महसूल मंडळ समाविष्ठ असलेल्या हिंगणघाट विधानसभा मतदार संघात कुणावारांनी गेल्या साडेचार वर्षात केलेले विकास कामे हे आजवरच्या हिंगणघाटच्या इतिहासातील ऐतिहासीक कामे आहे. व्यक्तीगत जनसंपर्क प्रचंड दांडगा असल्याने कुणावारांना या मतदार संघात लढत देण्यासाठी विरोधकांनाही तोडीचा उमेदवार शोधावा लागणार आहे. यातच विरोधकांचा कस लागणार हे निश्चित.