ढगा जंगलात आढळले एटीएम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 06:00 AM2020-01-04T06:00:00+5:302020-01-04T06:00:06+5:30
खरांगणाचे ठाणेदार संजय गायकवाड यांनी आपल्या चमूसह घटनास्थळ गाठून सदर एटीएम मशीन ताब्यात घेतली. शिवाय घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. एटीएम पळवून नेण्यात आल्याचा गुन्हा सेवाग्राम पोलीस ठाण्यात दाखल असल्याने सेवाग्रामचे ठाणेदार कांचन पांडे यांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. बारकाईने पाहणी अंती सदर एटीएम मशीन सेवाग्राम परिसरातून पळवून नेण्यात आलेली नसल्याच्या निकषावर पोलीस पोहोचले.
लोकमत न्यूज नेटवर्क
खरांगणा (मो.) : वर्धा शहराशेजारील सेवाग्राम येथील मेडिकल चौकातील एटीएम कक्षातून रोकड असलेली मशीन चोरून नेल्याची घटना ताजी असतानाच ढगा जंगल परिसरात बेवारस स्थितीत एटीएम मशीन आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी चोरी केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ही एटीएम मशीन जंगलात फेकली असावी, असा कयास पोलिसांकडून लावला जात आहे.
खरांगणा पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या ढगा जंगल परिसरात एटीएम मशीन बेवारस स्थितीत पडून असल्याची माहिती काहींनी खरांगणा पोलिसांना दिली. त्यानंतर खरांगणाचे ठाणेदार संजय गायकवाड यांनी आपल्या चमूसह घटनास्थळ गाठून सदर एटीएम मशीन ताब्यात घेतली. शिवाय घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. एटीएम पळवून नेण्यात आल्याचा गुन्हा सेवाग्राम पोलीस ठाण्यात दाखल असल्याने सेवाग्रामचे ठाणेदार कांचन पांडे यांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. बारकाईने पाहणी अंती सदर एटीएम मशीन सेवाग्राम परिसरातून पळवून नेण्यात आलेली नसल्याच्या निकषावर पोलीस पोहोचले. वर्धा जिल्ह्याच्या शेजारील अमरावती, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ आदी ठिकाणी एटीएम पळवून नेण्यात आल्याची घटना घडली काय याचीही शहानिशा पोलिसांकडून केली जात आहे.
मागील आठ ते दहा दिवसांमध्ये नागपूर जिल्ह्यातील दोन ठिकाणी तर वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथून एटीएम मशीन पळवून नेण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. अशातच ढगा जंगल परिसरात एटीएम आढळून आले आहे. सेवाग्रामसह एकूण तीन पोलीस ठाण्यात सदर मशीनबाबत विचारणा करण्यात आली आहे. परंतु, मशीन नेमकी कुठली हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
- संजय गायकवाड, ठाणेदार, खरांगणा.