एटीएमच्या ‘नो कॅश’ने नागरिक त्रस्त
By admin | Published: April 13, 2017 01:33 AM2017-04-13T01:33:39+5:302017-04-13T01:33:39+5:30
नोटाबंदीच्या निर्णयाला चार महिन्यांचा कालावधी लोटला तरीही एटीएमची व्यवस्था अद्याप सुरळीत झालेली नाही.
जिल्ह्यातील अनेक एटीएम बंदच : शेतकरी, व्यापारी व चाकरमान्यांना मनस्ताप
वर्धा : नोटाबंदीच्या निर्णयाला चार महिन्यांचा कालावधी लोटला तरीही एटीएमची व्यवस्था अद्याप सुरळीत झालेली नाही. त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहरातील बहुतांश एटीएम केंद्र बंद असतात. हीच परिस्थिती ग्रामीण भागातही असल्याने एटीएम केंद्र कधी सुरळीत होईल याची ग्राहकांना प्रतीक्षा आहे.
शासनाने एटीएमच्या व्यवहारावर मर्यादा आणल्या आहे. महिन्याभरात ठराविक व्यवहारवर सवलत दिली आहे. असे असताना एटीएम बंद राहत असल्याने ग्राहकांना नाहक भुर्दंड सोसावा लागतो. बँकेकडे तक्रार करुनही एटीएम सुरू करण्यात येत नाही, असे ग्राहक सांगतात. अनेकदा एटीएम बंद असल्याने ग्राहकांना शहरभर भटकंती करावी लागते. त्यातही एखादे एटीएम केंद्र सुरू असेल तर तेथे ग्राहकांच्या रांगा असतात. यात वेळ आणि श्रम व्यर्थ जातात.
बँकाच्या या कार्यप्रणालिविषयी ग्राहकांत संताप व्यक्त होत आहे. खासगी आणि राष्ट्रीयकृत बँकांचे एटीएम केंद्र सर्व प्रमुख चौकात आहेत. मात्र कुठलाही सण किंवा उत्सव असला की, हे एटीएम केंद्र बंद असतात. अशात कोणत्याही केंद्रावर गेले तरी रिकाम्या हातानेच परतावे लागते. यामुळे ग्राहकांना आर्थिक व्यवहारात करताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बहुतांश एटीएमवरुन आजही दोन हजाराचीच नोट मिळते. साधारण व्यवहार करताना सुटे पैसे देण्याचा प्रश्न असतो. यात ग्राहकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)