सहा महिन्यांपासून एटीपी केंद्र बंद
By admin | Published: July 18, 2016 12:40 AM2016-07-18T00:40:18+5:302016-07-18T00:40:18+5:30
वीज ग्राहकांना बिल भरताना अधिक त्रास होऊ नये म्हणून महावितरणने एटीपी केंद्र सुरू केले;
ग्राहकांत असंतोष : बिल भरताना अडचणी
हिंगणघाट : वीज ग्राहकांना बिल भरताना अधिक त्रास होऊ नये म्हणून महावितरणने एटीपी केंद्र सुरू केले; पण गत सहा महिन्यांपासून शहरातील हे केंद्र बंद आहे. परिणामी, वीज ग्राहकांना बिल भरताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
शहरातील सुभाष चौक येथे महावितरणने वीज बिल भरण्यासाठी एटीपी केंद्र सुरू केले; पण ते सहा महिन्यांपासून बंद आहे. ते कुलूपबंद अवस्थेत असल्याने ग्राहकांना आल्या पावली परत जावे लागते. यात वीज ग्राहकांची गोची होत असून असंतोष पसरला आहे. सदर केंद्र सुरू करावे, या मागणीसाठी अनेकदा निवेदने दिली; पण अद्याप कार्यवाही करण्यात आली नाही. ते केंद्र कधी सुरू होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना याचा अधिक फटका बसत आहे. ग्राहकांना पारदर्शक व चांगली सेवा देता यावी म्हणून वीज कंपनीने ही एटीपी सुविधा अनेक शहरांत उपलब्ध केली होती, हे विशेष! वीज ग्राहकांना लांबलचक रांगेपासून काही प्रमाणात मुक्तता मिळाली होती. ही सुविधा आता बंद असल्याने बिल भरताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे लक्ष देत एटीपी केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी)
वीज वितरण कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एटीपी मशीनची सुविधा उपलब्ध करून अत्यंत कमी वेळात वीज देयक अदा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. या केंद्राची वेळही ग्राहकांना सोयीची वाटत असल्याने सदर केंद्राची उपयोगिता सिद्ध झाली. ही सुविधा वीज ग्राहकांच्या पसंतीस उतरली असताना सहा महिन्यांपासून सदर केंद्रच बंद आहे. आता तर त्याला कुलूपच लावण्यात आले आहे. यामुळे चांगल्या सुविधेला वीज ग्राहक मुकले आहेत. अकार्यक्षम व्यवस्थापनामुळे चांगल्या योजनांचा फज्जा उडतो.