वर्धा जिल्ह्यात मोसंबीवर बुरशीजन्य रोगाचा हल्ला; ५० टक्के फळगळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 08:46 PM2021-08-28T20:46:42+5:302021-08-28T20:47:10+5:30

Wardha News तारासावंगा परिसरात गेल्या आठवडाभरापासून बुरशीजन्य रोगामुळे मोसंबी फळाची मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. त्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, आधीच कोरोनामुळे फळांना भाव नसल्याने संकटात असलेले शेतकरी फळगळतीमुळे हवालदिल झाले आहे.

Attack of fungal disease on citrus in Wardha district; 50% fruit drop | वर्धा जिल्ह्यात मोसंबीवर बुरशीजन्य रोगाचा हल्ला; ५० टक्के फळगळती

वर्धा जिल्ह्यात मोसंबीवर बुरशीजन्य रोगाचा हल्ला; ५० टक्के फळगळती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

 

वर्धा: तारासावंगा परिसरात गेल्या आठवडाभरापासून बुरशीजन्य रोगामुळे मोसंबी फळाची मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. त्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, आधीच कोरोनामुळे फळांना भाव नसल्याने संकटात असलेले शेतकरी फळगळतीमुळे हवालदिल झाले आहे. (Attack of fungal disease on citrus in Wardha district)

             तारासावंगा परिसरात आंब्या बहराच्या मोसंबीला चांगली फळधारणा झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. शेतकऱ्यांनी मोसंबीवरील रोगांपासून बचावाकरिता अनेक महागड्या औषधांच्या फवारण्या देखील केल्या. झाडावर फळांचे प्रमाण जास्त असल्याने एकूण उत्पन्न जास्त मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगेच बागा व्यापाऱ्यांना विकण्याऐवजी काही दिवस वाट पाहण्याचे ठरवत बागा विकल्या नाही. परंतु आता अचानक बुरशी रोगाने मोसंबीवर हल्ला केल्याने ५० टक्क्यांहून अधिक फळ गळून पडत आहे.

             परिसरातील माणिकवाडा, वाडेगाव,साहुर, दृगवाडा, वडाळा बोरगाव,जामगाव व वर्धपूर येथील मोठ्या प्रमाणात मोसंबीची फळगळती होत आहे. १५ ते १८ हजार रुपये प्रति टन व्यापाऱ्यांकडून मागणी सुरू असतानाच परिसरात होणारी फळगळ शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. तर गेल्या वर्षापासून सतत होणारी फळगळ व अन्य काही रोग यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात फळबागांवर होत नव्हते हे इतिहासात पहिल्यांदाच पाहात असल्याचे जाणकार शेतकऱ्यांनी सांगितले.

             गेल्या आठवडाभरापासून मोठ्या प्रमाणात तारासावंगा परिसरात फळगळतीमुळे शेकडो टन मोसंबीचे नुकसान सुरू आहे. दुर्दैवाने जर फळगळ एवढ्याच मोठ्या प्रमाणात सुरू राहिली तर, मोसंबी उत्पादनासाठी फळबागांची घेतलेली काळजी, महागड्या फवारणीसाठी लागलेला खर्च देखील निघणे कठीण होणार आहे. यामुळे या रोगावर तातडीने उपाय सुचवावा व मोसंबी उत्पादकांचे नुकसान टाळावे यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी तारासावंगा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

मोसंबीवर बुरशी रोगांचे आक्रमण केल्याने मोठ्या प्रमाणात फळगळती सुरू आहे. माझी तीन एकरामध्ये मोसंबीची बाग असून इतक्या महागड्या फवारण्या मोसंबीवर केल्या परंतु ऐन हंगामात व्यापाऱ्यांकडून मोसंबीला मागणी घातली जात असताना आठवडाभरापासून फळगळती सुरू आहे.

रमेश नासरे, मोसंबी उत्पादक शेतकरी, तारासावंगा

Web Title: Attack of fungal disease on citrus in Wardha district; 50% fruit drop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती