भोंगे लावून प्रचार करणाऱ्या आॅटोचालकावर हल्ला
By admin | Published: February 9, 2017 12:35 AM2017-02-09T00:35:19+5:302017-02-09T00:35:19+5:30
आॅटोवर लाऊडस्पीकर लावून प्रचार करीत असताना झालेल्या वादात आॅटोचालक सतीश नारायण पाटील (३५) याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला.
महाबळा येथील घटना : युवक जखमी
सेलू : आॅटोवर लाऊडस्पीकर लावून प्रचार करीत असताना झालेल्या वादात आॅटोचालक सतीश नारायण पाटील (३५) याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला. ही घटना महाबळा गावात बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.
तक्रारीनुसार, सतीश महाबळा गावात निवडणुकीसाठी आॅटोवर भोंगे लावून प्रचार करीत होता. दरम्यान, तेथीलच गजानन तानबा भावरकर याने वाद घातला. वाद विकोपाला गेल्याने सतीशवर कुऱ्हाडीने हल्ला केला. यात तो जखमी झाला. प्रचार आॅटो कॉँग्रेसच्या उमेदवाराचा तर हल्ला करणारा भाजपच्या कार्यकर्त्याचा भाऊ असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
पोलीस पाटलाने प्रत्यक्ष चौकशी केली असता फिर्यादी व आरोपी दोघेही व्यवसायाने आॅटोचालक असून त्यांच्यात जुना वाद आहे. यातून हा हल्ला झाला, असे ठाणेदार संजय बोठे यांनी सांगितले. या प्रकरणी आरोपी गजानन विरूद्ध कलम ३२६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. वृत्त लिहिस्तोवर आरोपीला अटक करण्यात आली नव्हती.(तालुका प्रतिनिधी)
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार तक्रार लिहून घेण्यात आली. फिर्यादी व आरोपी हे दोघेही व्यवसायाने आॅटोचालक आहेत. दोघांत असलेल्या जुन्या वादातून हे प्रकरण घडले. तक्रारकर्त्याने राजकीय पद्धतीने तक्रार दिली. वास्तविक, जुन्या वादातून झालेला हा प्रकार आहे.
- संजय बोठे, ठाणेदार, पोलीस स्टेशन, सेलू.