अट्टल दुचाकी चोर ‘ऋषभ’ पोलिसांच्या गळाला; ‘प्राॅपर्टी सेल’ची कारवाई
By चैतन्य जोशी | Published: January 15, 2024 07:02 PM2024-01-15T19:02:47+5:302024-01-15T19:03:23+5:30
‘प्राॅपर्टी सेल’ची कारवाई : चोरीचे दोन गुन्हे आणले उघडकीस
वर्धा : शहरातील विविध ठिकाणाहून दुचाकी चोरी होत असल्याच्या घटना काही दिवसांपासून सतत घडत होत्या. पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी चोरट्याला अटक करण्याचे निर्देश दिले असता पोलिसांनी कसोशीने तपास करून अट्टल दुचाकी चोरास बेड्या ठोकून दुचाकी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणत चोरीतील दुचाकी हस्तगत केल्या. ही कारवाई प्रॉपर्टी सेलकडून १४ रोजी रविवारी रात्रीच्या सुमारास करण्यात आली.
ऋषभ सुरेशराव सुतसोनकर (२५ रा. बोरगाव मेघे) असे अटक केलेल्या अट्टल चोरट्याचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून शहरातील विविध ठिकाणावरून दुचाकी चोरी जात असल्याच्या घटना घडत होत्या. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलिसांकडून समांतर तपास सुरू करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी बसस्थानक परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणाची नोंद शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
पोलिसांनी सखोल तपास केला असता बोरगाव येथील ऋषभ सुतसोनकर याने चोरल्याचे समजले. पोलिसांनी ऋषभ याला ताब्यात घेत पोलिसी हिसका दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी दोन दुचाकी हस्तगत करून आरोपी चोरट्याला अटक करून गुुन्हा दाखल करीत शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशात पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, शिवकुमार परदेशी, नरेंद्र पाराशर, नितीन इटकरे, मिथुन जिचकार यांनी केली.