प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न ; वर्धा जिल्ह्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 10:37 AM2020-02-03T10:37:21+5:302020-02-03T16:11:29+5:30
नंदोरी मार्गावर एका माथेफिरू तरुणाने सोमवारी सकाळी ७.३० च्या सुमारास एका महिला प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या हल्ल्यात ही तरुणी गंभीररित्या जखमी झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा- येथील नंदोरी मार्गावरील महालक्ष्मी किराणा दुकानासमोर एका माथेफिरू विवाहित तरुणाने प्राध्यापक तरूणी वर पेट्रोल ओतून पेटवून दिले. त्यात ती गंभीर जखमी झाली तिला प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नागपुर ला हलविण्यात आले. ही घटना सकाळी 7.30 वाजता वर्दळीच्या रस्त्यावर घडली.
सदर प्राध्यापक तरुणी दारोडा ची रहवासी असून येथील मातोश्री आशाताई कुणावार महाविद्यालयात वनस्पती शास्त्राची प्राद्यापक आहे. दररोज दारोडा येथून बसने येऊन स्थानिक नंदोरी बस थांब्यावर उतरते. नेहमी प्रमाणे आज सकाळी ती नंदोरी चौकातुन पायदळ कॉलेजमध्ये जात होती. दरम्यान तिचा मागावर असलेला एक युवक दुचाकीवर पाठीमागून आला, त्यांने आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली. त्याने स्वतःच्या गाडीतील पेट्रोल कापलेल्या प्लॅस्टिक बॉटल मध्ये काढले तसेच कपडा गुंडाळलेला टेंभा त्याच्या सोबत होता, या तरुणीचा पाठलाग करित अकस्मात तिच्या अंगावर त्याने पेट्रोल टाकले व पेटवलेला टेम्भा तिच्या अंगावर फेकला व तेथून पळ काढला. या पेट्रोल हल्ल्यात ती गंभीर भाजली, तिच्या पाठीमागून पायदळ येत असलेल्या एक विद्यार्थीनी आणि या मार्गाने जाणाऱ्या युवकांनी तिला विझवून येथील उपजिल्हा रुग्णांलयात दाखल केले, प्राथमिक उपचारानंतर तिला पुढील उपचारकरिता नागपूर येथे पाठविण्यात आले . या घटनेनंतर आरोपी व त्याचा सहकारी मोटारसायकल ने पळून गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी एका विद्यार्थीनीने पोलिसांना दिली.या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी म्हणून विकेश नगराळे रा.दारोडा या युवकाला पोलिसांनी टाकळघाट, बुटीबोरी पोलीस स्टेशन येथून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उमेश तुळस्कर यांचे तक्रारीवरून भादवी 307, व 326 या अन्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. अमानवीय कृत्यामुळे शहरात एकच खळबळ माजली असून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा आक्रोश
प्रध्यापिकेवर झालेल्या पेट्रोल हल्ल्याची माहिती मातोश्री कुणावार महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी मिळताच त्या येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर येऊन धडकल्या. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात जिल्हा पोलीस अधीक्षक बसराज तेली हे उपस्थित होते. मुलींनी त्यांना गराडा घालून दोषी युवकावर कठोर कारवाईची मागणी केली, यावेळी विद्यार्थिनींनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करतांना त्यांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी विद्यार्थिनींनी न्याय देण्याच्या घोषणाही दिल्या.
आयजी समोर उसळला जनआक्रोश
पूर्व नियोजित पाहणी दौऱ्या निमित्याने आज सकाळी के.एम.मल्लिकार्जुन प्रसन्ना हे शहरात आले होते. त्यांची पोलीस अधिकाऱ्यांसोबत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात बैठक सुरु होती. दरम्यान प्रध्यापिकेवर झालेल्या पेट्रोल हल्ल्याने संतप्त झालेला जमाव या कार्यालयासमोर पोहचला. यावेळी प्रवीण उपासे, उमेश तुळसकर,अनिल जवादे, मनोज रुपारेल, रुपेश लाजुरकर, मनीष देवढे , ज्वलंत मून , मिर्झा परवेज बेग, आकाश पोहाणे, दिनेश वर्मा,राहुल दारूनकर, धनंजय बकाणे, राजेश शेंडे आदी सह विविध पक्ष व संघटनाचे पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गाठून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असून कठोर पावले उचलण्याची मागणी त्यांनी केली.यावर बैठक घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन आयजी प्रसन्ना यांनी उपस्थितांना दिले.