पवनार गटात सहा उमेदवारांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा
By Admin | Published: February 11, 2017 12:51 AM2017-02-11T00:51:50+5:302017-02-11T00:51:50+5:30
नव्याने तयार झालेल्या पवनार गटातीत एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नसून सर्व उमेदवार रिंगणात कायम आहे.
चौरंगी लढत : उमेदवारांची प्र्रचारात आघाडी
श्रीकांत तोटे पवनार
नव्याने तयार झालेल्या पवनार गटातीत एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नसून सर्व उमेदवार रिंगणात कायम आहे. पक्षाने तिकीट नाकारली म्हणून बंडखोरी करीत उमेदवारी कायम ठेवल्याने गटातील निवडणुकीची चुरस वाढली आहे.
पवनार गटाकरिता सुनिता ढवळे व सीमा साखरकर यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली होती. सीमा साखरकर यांच्याकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आले. परंतु पक्षाने शुभांगी हिवरे यांना तिकिट दिल्यामुळे दोन्ही उमेदवारांनी अर्ज मागे न घेता लढण्याचे ठरविले. सुनिता ढवळे यांनी तिनवेळा जि.प. निवडणूक लढविली आहे. त्या अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात होत्या. यात त्यांनी विजय संपादन केला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. आता भाजपच्या उमेदवार शुभांगी हिवरे व काँग्रेसच्या अर्चना टोणपे यांचे तगडे आव्हान असेल. भाजप कार्यकर्त्यांनी प्रचाराचा नारळ फोडून आघाडी घेतली आहे. शिवसेनेच्या बोकडे व बसपाच्या महाकाळकर या देखील रिंगणात आहे. त्यामुळे विजय मिळविणे तितकेसे सोपे नसल्याचे दिसून येते.
पवनार गणात काँग्रेसचे प्रमोद लाडे व भाजपाचे जयंत गोमासे हे पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांच्या विरोधात उभे आहे. अपक्ष उमेदवार नितीन कवाडे यांनी उमेदवारी दाखल केल्यामुळे गणातील लढतीची चुरस वाढली आहे. शिवसेनेचे हिवरे, अपक्ष उमेदवार नितीन डुकरे, बसपाचे शालिक काकडे यांच्याकडून कडवे आव्हान मिळू शकते.
महाकाळ-साटोडा गणाकरीता भाजपकडून डॉ. भामकर, काँग्रेसकडून अमित गावंडे तर अपक्ष उमेदवार सागर शिंदे यांच्यात तिरंगी लढतीचे चिन्ह आहे. चिन्ह वाटप झाल्यामुळे अपक्ष उमेदवारांकडून प्रचार जोरात सुरू झाला आहे. तरी अपक्षांना यात चांगलीच दमछाक करावी लागत असल्याचे दिसते.